नवी दिल्ली: लातूर-पुणे दरम्यान वाढती प्रवाशांची संख्या लक्षात घेता लातूर-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस ही नवी रेल्वे गाडी तातडीने सुरु करण्यात यावी अशी मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव, माजी राज्यमंत्री, आमदार अमित देशमुख यांनी आज रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची नवी दिल्ली येथे भेट घेवून केली आहे. लातूर रेल्वेच्या संदर्भातील विविध प्रश्नही यावेळी त्यांनी रेल्वेमंत्र्यासमोर मांडले. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेली लातूर-मुंबई रेल्वे बिदरपर्यंत विस्तारित करण्यात आल्याने लातूर येथील रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. या मार्गावर अन्य गाडी नसल्याने लातूर-मुंबई रेल्वेसेवा पूर्ववत करण्यात यावी. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता या रेल्वेला अतिरिक्त बोगीज जोडण्यात याव्यात ही या भागातील जनतेची मागणी आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थींचे जतन करण्यात आले आहे. या चैत्यभूमीला येणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी सर्व जलद रेल्वे गाड्यांना रेणापूर येथे थांबा देण्यात यावा अशी मागणीही त्यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली. लातूर येथे उभारण्यात येत असलेल्या कोच फॅक्टरीचे काम अत्यंत संथ गतीने होत आहे. या फॅक्टरीच्या कामाला गती देण्याबाबत आणि या कारखान्यात लातुरातील अधिकाधिक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्याबाबत आपण लक्ष घालावे अशी विनंतीही आमदार अमित देशमुख यांनी केली आहे.
Comments