रवींद्र जगताप, लातूर: आज मुख्यमंत्री जनादेश घेऊन लातूर जिल्ह्याच्या दौर्यावर आले आहेत. त्यांना लातूर जिल्ह्यातील जनेतेने जनादेश का द्यावा? असा प्रश्न एका जाहिरातीतून करण्यात आला आहे. एका वर्तमानपत्रात मुख्यमंत्र्यांना कुरवाळणार्या जाहिरातींचा पाऊस आहे. याच वर्तमानपत्रात औसा येथील राष्ट्रवादीचे नेते अफसर शेख यांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. मा. मुख्यमंत्री जरा आमच्याकडे बघा असं नम्र आवाहनही या जाहिरातीत करण्यात आलं आहे. अहमदपूर शहरासह ग्रामीण भागाचाही पाणी प्रश्न गंभीर बनला आहे, लिंबोटी धरणातून आणावयाच्या पाण्यासाठी चालू असलेले पाईपलाईनचे काम धिम्या गतीने सुरु आहे. अहमदपूर एमआयडीसीचे विस्तारीकरण झाले नाही, ट्रामा केअर युनिटचे साहित्य धूळ खात पडले आहे. चाकूर तालुक्यातही भीषण पाणी टंचाई आहे. रस्त्यांची दुर्दशा झाली आहे, इथल्याही ट्रामा केअर युनिटची अवस्था तशीच आहे. जय जवान साखर कारखाना बंद आहे. अजून औशाला माकणीहून कायमस्वरुपी पाणी मिळाले नाही. औसा शहराची हद्दवाढ मंजूर झाली नाही, शहरातील क्रीडा संकुलाचा प्रश्न तसाच आहे. या तालुक्याला अत्यल्प पीक विमा मिळाला, महावितरणकडून नव्या मीटरच्या माध्यमातून लूट चालू आहे, असे अनेक प्रश्न या जाहिरातीतून मांडण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील मोठ्या अडचणी लक्षात आणून देण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे. लातुरच्या इतिहासात अशा प्रकारची जाहिरात पहिल्यांदाच प्रसिद्ध झाली असावी!
लातुरचं काय?
सातत्यानं भीषण टंचाईला तोंड देणार्या लातुरला उजनीचं पाणी देण्याचं सरकारनं कबूल केलं होतं त्याचं काय झालं? पाच वर्षे काय केलं? लातुरची एकमेव जीव की प्राण असलेली लातूर मुंबई रेल्वे घालवली, दुसरी सुरु करतो म्हणाले होते त्याचं काय झालं? लातूर अजमेर रेल्वेचं आश्वासन गडकरी साहेबांनी दिलं होतं ही गाडी कुठे अडली? एमआयडीसीची अवस्था वाईट आहे, नव्या उद्योगांचं काय झालं? असे अनंत प्रश्न आ वासून उभे आहेत. आता बडी दिग्गज मंडळी भाजपात आली आहे, आणखी येऊ लागली आहे. यामुळं भाजपाला प्रश्न विचारणारी मंडळी शिल्लक राहील की नाही अशी शंका येऊ लागली आहे. म्हणूनच अफसर शेख यांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात विचार करायला लावणारी आहे.....लातूर जिल्ह्यातील जनतेने भाजपाला जनादेश का द्यावा?
Comments