औसा: अभिमन्यू पवार यांच्या पालकत्वातील औसा विधानसभा मतदारसंघासाठी लेखाशीर्ष २५१५ अंतर्गत १५ कोटी रुपयांच्या निधीला अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मान्यता दिली . या मतदारसंघाच्या विकासासाठी यापुढेही निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली. मागच्या दोन-तीन वर्षात मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी पालकत्व स्विकारत मतदारसंघाच्या विकासासाठी कामे केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठबळावर मतदारसंघासाठी जवळपास २५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या ग्रामविकास खात्याच्या माध्यमातूनही या भागात विविध विकासकामांसाठी निधी खेचून आणला. महाजनादेश यात्रेनिमित्त झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत अभिमन्यू पवार यांनी केलेल्या विकासकामांमुळे जनता किती प्रभावित झाली आहे ते मुख्यमंत्र्यांनीही पाहिले.
अभिमन्यू पवार यांच्याच पाठपुराव्यामुळे पूर्वी मतदारसंघात विविध कामे करण्यासाठी ११ कोटी २७ लाख रुपये देण्यात आले आहेत. त्यानंतर उर्वरित गावात कामे करता यावीत यासाठी पवार यांनी आणखी १५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी पंकजाताई मुंडे यांच्याकडे केली होती. या मागणीला प्रतिसाद देत पंकजाताई आणि अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी लेखाशीर्ष २५१५ अंतर्गत हा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे मतदारसंघाला एकूण २६ कोटी २७ लाख रुपये मिळणार आहेत. या निधीतून मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासकामे करता येणार असल्याचे अभिमन्यू पवार यांनी सांगितले. मतदारसंघाच्या विकासासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे आणि पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे आभार मानले आहेत.
Comments