लातूर: राज्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या लातूर जिल्ह्याने राज्याच्या राजकारणाला अनेक धुरंदर नेते दिलेले आहेत. यापूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेला हा जिल्हा आता भाजपाचा गड मानला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आवडता जिल्हा म्हणून असलेल्या लातूरातील सहाही विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छुक असले तरी पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयाला बांधील राहून सहाही विधानसभेवर भाजपचा झेंडा फडकवावा असे आवाहन पाणी पुरवठा मंत्री तथा पक्षनिरीक्षक बबनराव लोणीकर यांनी केले.
शहरातील शासकीय विश्रामगृह येथे भाजपातर्फे विधानसभा निवडणुक लढविण्यास इच्छुक असणार्यांच्या मुलाखती आज ना.लोणीकर यांनी घेतल्या. या मुलाखतीपूर्वी भाजपा जिल्हा पदाधिकार्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, प्रदेश उपाध्यक्ष माजी आ.गोविंद केंद्रे, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, डॉ.गोपाळराव पाटील, शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलींद लातूरे, महापौर सुरेश पवार, आ. विनायक पाटील, आ. सुधाकर भालेराव, रमेश कराड, अभिमन्यू पवार, दिलीपराव देशमुख आदिंची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात तर पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा भाजपाचा गड झालेला असून येथील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपाची सत्ता आहे. त्यामुळेच या जिल्ह्याच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष असल्याचे सांगून ना.लोणीकर यांनी लातूर जिल्हा हा मुख्यमंत्र्यांचा आवडता जिल्हा असल्याचे आवर्जून सांगितले. पक्ष मोठा झालेला असून पक्षाचे कार्यही मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. यासोबतच संघटनच्या माध्यमातून पक्षाची शक्ती वाढली असल्याने विधानसभा निवडणुक लढविणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वास्तविक पाहता आगामी होणारी विधानसभा निवडणुक ही आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाची असून लोकसभेपेक्षा विधानसभेची निवडणूक वेगळी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. निवडून येण्याचा निकष आणि मतदारसंघातील परिस्थिती यावरच उमेदवार कोण असणार याचा निर्णय पक्ष घेणार आहे. मात्र पक्षाने जो निर्णय घेतला आहे तो सर्वांशी बांधील असून कोणीही पक्ष विरोधी वक्तव्य अथवा काम करू नये याची दक्षता घ्यावी असे स्पष्टच सांगितले. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्याला हजारो कोटी रूपयांचा निधी प्राप्त झालेला असल्याने जिल्ह्याचा विकास होवू लागलेला आहे. अधिक विकास होवून समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत विकास योजना पोहचाव्यात याकरिता आगामी विधानसभा निवडणुका जिंकणे आपले लक्ष्य असून याकरिता प्रत्येकांनी योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी यावेळी लातूर व उस्मानाबादचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटून जिल्हा दुष्काळमुक्त व्हावा याकरिता ना. लोणीकर यांच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने दोन्ही जिल्ह्याकरिता वॉटरग्रीडचे काम लवकरच सुरू होणार आहे. या वॉटरग्रीडला तात्काळ मंजुरी देवून त्याची निविदा लवकरच काढणार असल्याबद्दल जिल्ह्यातील जनतेच्या व जिल्हा भाजपाच्यावतीने त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. ना. लोणीकर पक्षनिरीक्षक म्हणून आले असून इच्छुकांनी पक्ष शिस्तीप्रमाणे मुलाखती देवून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. पक्ष पदाधिकार्यांच्या बैठकीनंतर मतदारसंघनिहाय इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सर्वप्रथम जिल्हा कोअर कमिटीची बैठक घेवून सहाही विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती बाबत विस्तृत चर्चा केली. यावेळी मुलाखतीसाठी इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
Comments