HOME   लातूर न्यूज

मंडळांनी मूर्ती विसर्जित न करता स्वतःकडेच ठेवाव्यात

लहान मुर्त्यांचे विसर्जन अन्यत्र करु नका, घरीच विसर्जन करा- जिल्हाधिकारी


मंडळांनी मूर्ती विसर्जित न करता स्वतःकडेच ठेवाव्यात

लातूर: जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे टंचाईची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत पिण्याचे पाणी देणे ही मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे गणेश मूर्तीच्या विसर्जनाला पाणी नाही. तरी सर्व गणेश मंडळांनी त्यांच्याकडील गणेश मूर्तीचे विसर्जन न करता त्या मूर्ती स्वतःकडेच सुरक्षित ठेवाव्यात अथवा प्रशासनाला दान कराव्यात. तसेच सर्वसामान्य नागरिकांनी घरातल्या गणपतीचे घरीच टबमध्ये विसर्जन करावे अथवा मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना करावी असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले.
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्रीकांत बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, पोलीस उपाध्यक्ष सचिन सांगळे, महापालिका उपायुक्त संभाजी वाघमारे यांच्यासह गणेश मंडळाचे अध्यक्ष, प्रतिनिधी व मूर्तिकार उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले की, टंचाई परिस्थितीमध्ये लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही सर्वात मोठी जबाबदारी आहे, त्यामुळे या परिस्थितीमध्ये गणेश विसर्जनासाठी पाणी उपलब्ध होणार नाही. तरी सर्व गणेश मंडळांनी गणेश मूर्तीचे विसर्जन करू नये व त्या मूर्ती त्यांच्याकडेच ठेवाव्यात अथवा प्रशासनाला दान कराव्यात. तसेच गणेश मंडळांनी त्यांच्या भागातील नागरिकांनी आपल्या घरातील गणपती विसर्जन न करता त्या मूर्तींची पुनर्प्रतिष्ठापना करावी अथवा घरच्या घरीच गणेश मूर्तीचे विसर्जन करावे याबाबत प्रबोधन करण्याचे आवाहन ही त्यांनी केले. पुढील वर्षापासून मूर्तिकारांनी पर्यावरणपूरक मूर्ती तयार कराव्यात, जी गणेश मंडळे मूर्ती विसर्जनासाठी जिल्ह्याबाहेर घेऊन जात असतील तर त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी त्या गणेश मंडळाची राहील, लातूर शहरातील गणेश विसर्जनाच्या सर्व पारंपारिक ठिकाणी महापालिकेच्यावतीने गणेश मंडळाकडून मुर्त्या स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गणेश मंडळांनी मिरवणूक झाल्यानंतर गणेश मूर्ती महापालिकेकडे द्याव्यात असेही त्यांनी सूचित केले. लातूर शहरात एकूण ३१७ गणेश मंडळे असून यातील ५९ गणेश मंडळांनी मूर्ती स्वतःकडेच ठेवण्याचे आश्वासन दिलेले आहे तर २०७ गणेश मंडळे हे प्रशासनाकडे मुर्त्या दान करणार आहेत.


Comments

Top