HOME   लातूर न्यूज

उजनीचे पाणी न आणल्यास राजीनामा देऊ

पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांची भीष्मप्रतिज्ञा


उजनीचे पाणी न आणल्यास राजीनामा देऊ

लातूर: आगामी दोन वर्षात उजनीचे पाणी लातूरला आणणारच अशी भीष्म प्रतिज्ञा पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केली. उजनीचे पाणी नाही आले तर आहे त्या पदाचा राजीनामा देउन आयुष्यभर पाण्यासाठी संघर्ष करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. महाराष्ट्र टाइम्स औरंगाबादने काढलेल्या 'प्रगती पथावर लातूर जिल्हा' या विशेषांकाचे प्रकाशन संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी होते.
पालकमंत्री निलंगेकर म्हणाले की, अनेक ठिकाणी सोन्याच्या, चांदीच्या, हिऱ्याच्या खाणी असतात परंतु लातूर जिल्हा ही गुणवंताची, ज्ञानाची खाण असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्याची क्षमता खूप मोठी आहे. इथला विकास हा देशातील कोणत्याही जिल्ह्यापेक्षा वेगळ्या पध्दतीने होत आला आहे. पुढेही होणार आहे. त्यामुळे पुढच्या पाच वर्षानंतर टाइम्स ग्रुपला लातूरच्या विकासाची महती सांगणारा कार्यक्रम दिल्लीत करावा लागेल अशी मला खात्री आहे. गेल्या दोन वर्षात लातूरच्या बाबतीत सर्वत्र नकारात्मक प्रसिध्दी मिळत असताना टाइम्स ग्रुपने लातूरची सकारात्मक बाजू जनतेसमोर आणली असे गौरवोद्‌गार काढुन त्यांनी विकासाच्या संकल्पनेवर भाष्य केले. यावेळी विशेषांकाचे मानकरी असलेले अरविंद पाटील निलंगेकर, रमेश बियाणी, नगरसेवक अजितसिंह पाटील कव्हेकर, संगमेश्वर बोमणे, दिनेश आंबेकर, जिल्हा बॅंकेचे प्रतिनिधी सुनील पाटील, एमबीएफचे प्रतिनिधी अमित मशरु यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. टाइम्स ग्रुपला छायाचित्र पाठविणारे तम्मा पावले आणि श्याम भट्टड यांनाही सन्मानित करण्यात आले. लातूर जिल्ह्याला विकासाची परंपरा ही शिवराज पाटील चाकुरकर, विलासराव देशमुख यांच्या पासून आहे. सध्या पालकमंत्री निलंगेकर हे विलासराव मुख्यमंत्री असताना जसे निर्णय घेत होते तसेच निर्णय घेत आहेत असे सांगून लक्ष्मीरमण लाहोटी यांनी लातूरच्या विकासाला गती देण्यासाठी लातूरच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्याची पालकमंत्र्यांकडुन अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाला जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष ॲड व्यंकट बेद्रे, महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, उद्योजक नितीन कलंत्री, हेमंत वैद्य, अजय ठक्कर, शिक्षण क्षेत्रातील नितीन शेटे, उमाकांत होनराव, परवेझ पटेल, अझहर शेख, प्रा. प्रेरणा होनराव, नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे, गुरुनाथ मगे, आदी उपस्थित होते.


Comments

Top