लातूर: लातूर व शेजारील इतर जिल्हयांची गैरसोय होऊ नये यासाठी लातूर येथे लवकरच नवीन महसूल आयुक्त कार्यालय होणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली. जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभाग, वैध मापनशास्त्र यंत्रणा, कार्यकारी मापक प्रयोगशाळा, निरीक्षक वैध मापन शास्त्र, लातूर-1 व लातूर-2 नवीन शासकीय इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी पालकमंत्री निलंगेकर बोलत होते.
यावेळी महापौर सुरेश पवार, शैलेश लाहोटी, उप महापौर देविदास काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बाबासाहेब थोरात, औरंगाबाद विभागाचे वैध मापनशास्त्र उपनियंत्रक शशिकांत चालिकवार, लातूर-उस्मानाबादचे सहाय्यक नियंत्रक संजीव कवरे, सहाय्यक कार्यकारी अभियंता रोहन जाधव, उप-अभियंता काळे यांच्यासह अन्य पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
पालकंत्री निलंगेकर पुढे म्हणाले की, प्रशासन अधिक गतीमान होण्यासाठी शासकीय इमारती गरजेच्या आहेत. लातूर व नांदेड या दोन्ही जिल्हयासाठी पुढील काळात नवीन महसूल आयुक्त कार्यालये व्हावीत यासाठी मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी केलेली आहे. लातूर व शेजारील इतर दोन जिल्हयांची गैरसोय होऊ नये म्हणून लातूरला लवकरच नवीन आयुक्त कार्यालय होईल. आजच्या वैधमापन शास्त्र इमारतीच्या उद्घाटनानंतर पुढचं उद्घाटन हे लातूरच्या नवीन आयुक्त कार्यालयाचे असेल, अशी खात्री त्यांनी दिली. या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील कोणतीही जागा खाजगी यंत्रणेला अजिबात दिली जाणार नाही. तसेच या परिसरात इतर सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणणार असल्याची माहिती निलंगेकर यांनी दिली.
Comments