लातूर: लिंगायत समाजाची आरक्षणाची मागणी आहे. या मागणीसाठी समाज संघर्ष करीत आहे. या समाजाला आरक्षणाच्या मागणीवर वेळोवेळी भाजप कडून आश्वासने दिली परंतु त्यांची पाच वर्षात त्याची पुर्तता केली नाही. यामुळे आता भाजपने लिंगायत समाजाला आरक्षण देण्याचा शब्द पाळावा असे आवाहन आमदार अमित देशमुख यांनी केले. लातूर येथे आयोजित राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. वीरशैव युवा सेवाभावी संस्था व लिंगायत समाज लातुरच्या संयुक्त विद्यमाने सावेवाडी भागातील शाम मंगल कार्यालयात राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते या वधू-वर परिचय मेळाव्याचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळयास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार अमित देशमुख म्हणाले की, लिंगायत समाजाच्या अनेक मागण्या सरकार दरबारी प्रलंबित आहेत. भाजपकडून सतत आश्वासने दिली, आता लिंगायत समाजाला आरक्षण देण्याचा शब्द भाजपने पाळावा, दैनंदिन व्यस्त जीवनातून समाजासाठी वेळ काढणे व अशा प्रकारचे उपक्रम राबविणे कौतुकास्पद आहे. या समाजाने आपल्याला खूप काही दिले असून आज मी ज्या ठिकाणी उभा आहे त्यात मोठा हात आपल्या सर्वांचा आहे. समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लिंगायत वाणी यातील स्वल्पविराम कमी करून आरक्षण मंजुरीसाठी लिंगायत वाणी असा उल्लेख असणारे केवळ एक शुद्धिपत्रक काढायचे आहे. ज्यासाठी गेली कित्येक दिवस समाज बांधव लढतोय मात्र सरकार याकडे गंभीरपणे पाहत नाही. लिंगायत वाणी उल्लेख असणारे शुद्धिपत्रक सरकारने लवकर काढावे यासह समाजाच्या अन्य मागण्यादेखील आहेत ज्याला आपला बिनशर्त पाठींबा असून इथेच न थांबता लोकप्रतिनिधी म्हणून समाजाच्या मागण्यासाठी पुढाकार घेणे हे आमचे काम आहे त्यासाठी लढा देण्याची देखील तयारी आहे असेही यावेळी स्पष्ट केले. यावेळी डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, ललितभाई शहा, श्रीशैल उटगे, दीपक सूळ, दीपक मठपती, भालचंद्र येडवे, विजयकुमार चितकोटे, केदारअप्पा रासुरे, प्रेरणा होनराव, सविता गांगापुरे, ओमप्रकाश झुरळे, गंगाधर हामीने, भालचंद्र मानकरी, पुष्पराज खुब्बा, बसवंत अप्पा भरडे यांच्यासह वीरशैव युवा सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी तसेच लिंगायत समाज बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.
Comments