HOME   लातूर न्यूज

अभिमन्यू पवार यांच्या उमेदवारीचं उस्फूर्त स्वागत

फटाक्यांची आतषबाजी, पेढे वाटून आनंदोत्सव, ग्रामीण भागातही जल्लोष


अभिमन्यू पवार यांच्या उमेदवारीचं उस्फूर्त स्वागत

औसा: मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांना औसा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली. अभिमन्यू पवार यांच्या उमेदवारीचे औसा मतदारसंघात उस्फुर्त स्वागत करण्यात आले. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. अभिमन्यू पवार यांनी मागच्या दोन-तीन वर्षात औसा विधानसभा मतदारसंघाचे पालकत्व स्विकारून विकासकामे गतिमान केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासासाठी जवळपास तीनशे कोटी रुपयांचा निधी खेचून आणला. यामुळे मतदारसंघातील विकास कामे गतिमान झाली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अभिमन्यू पवार यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली होती. पवार यांनी पक्षाकडे रितसर मुलाखतही दिली होती. भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्याच उमेदवारी यादीमध्ये अभिमन्यू पवार यांच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. मंगळवारी दुपारी उमेदवारी यादी जाहीर होताच औसा मतदारसंघातील विविध गावात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. औसा शहरातील बाजारपेठ, बस डेपो समोर आणि तुळजापूर अॅप्रोच रोड याठिकाणीही कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. पेढे वाटून आनंद साजरा केला. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी अभिमन्यू पवार यांना उमेदवारी दिल्याचा आनंद साजरा करत गुलालाची उधळण केली. मतदारसंघाच्या विकासासाठी अभिमन्यू पवार यांच्यासारखा सक्षम उमेदवार गरजेचा असल्याचे मत भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी व्यक्त केले.


Comments

Top