लातूर: गेली पाच वर्ष झाली सत्तेत आलेल्या भाजपा सेना सरकारने शेतकऱ्यांचे वाटोळं केलं मालाला भाव नाही विमा, औषध महागली कसं जगायचं अशा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने जाणीवपूर्वक पाच वर्ष थापा मारण्याचे काम केले असून हे भाजपा सेना सरकार म्हणजे शहरी बाबू सरकार असल्याची टीका राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी करत ही योग्य वेळ आपल्याला आलेली असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सरकार बदलण्यासाठी ग्रामीण मतदार संघातून उच्च शिक्षित युवक धीरज विलासराव देशमुख यांना विधानसभेत अधिक मताधिक्य देऊन निवडून द्यावे असे आवाहन सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले आहे. ते शनिवारी लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार धीरज विलासराव देशमुख यांच्या प्रचारार्थ औसा तालुक्यातील भेटा, बोरगाव, अंदोरा,जायफळ येथे मतदारांशी सुसंवाद बैठकीत ते बोलत होते
यावेळी व्यासपीठावर लातूर ग्रामीणचे आमदार अँड त्रिंबक भिसे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे, मांजरा साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन श्रीशैल्य उटगे, सदाशिव कदम, श्रीकृष्ण माने, गणपत बाजुळगे, शाम भोसले, सौ स्वयं प्रभा पाटील, हारिराम कुलकर्णी, शिवप्रसाद शिंदे, अशोक जगदाळे उपस्थित होते.
पुढे बोलताना दिलीपराव देशमुख म्हणाले की भादा सर्कल भागात लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात लोकनेते विलासराव देशमुख, बी.व्हि.काळे यांनी विकासाचा अनुशेष भरून काढलेला आहे. लातूर जिल्यातील विकासात्मक दृष्टीचे नेते चाकूरकर, विलासराव देशमुख यांचा हा बालेकिल्ला असलेल्या लातूर जिल्ह्यात विकासाची परंपरा आहे मात्र पंचवार्षिक निवडणुकीत थापा मारून सत्तेवर आलेल्या राज्य सरकारने गेली पाच वर्षे कुठलेही विकासाचे काम केले नाही सर्वच क्षेत्रात या राज्य सरकारबद्दल नाराजीचा सूर आहे विशेषतः शेतकऱ्यांना तर वाऱ्यावर सोडले कर्ज माफी, विमा, दुष्काळी मदत दिलीच नाहीत निव्वळ धूळफेक करण्याचा प्रयत्न सरकार करीत असताना आपण हे चित्र बदलण्यासाठी पुढच्या पिढीला चांगले दिवस आणण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार राज्यात आणले पाहिजे यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार धीरज विलासराव देशमुख यांना विधानसभेत निवडून द्यावे असे आवाहन दिलीपराव देशमुख यांनी केले.
Comments