लातूर: केंद्रात व राज्यात महायुतीचे भक्कम सरकार असल्याने लातूरातही याच विचाराचा आमदार निवडून द्या, असे आवाहन लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उनेदवार शैलेश लाहोटी यांनी केले. मार्केट यार्डात आयोजित आडत व्यापाऱ्यांचा कॉर्नर बैठकीत लाहोटी बोलत होते. यावेळी महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, अजित पाटील कव्हेकर, अजय दुडिले, दीपक मठपती, दिनकर पाटील, हेमंत पाटील, शिवराज केंद्रे, चंदू खंदाडे, विक्रम शिंदे, भालचंद्र दानाई, पुनीत बलदवा, अमोल पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी शैलेश लाहोटी म्हणाले की राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख असे म्हणत असत की केंद्रात व राज्यात ज्या विचाराचे सरकार त्याच विचाराचा आमदार लातुरातून निवडून द्या. आता केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या खंबीर नेतृत्वात भाजपची सरकारे विकास कामे करत आहेत. त्याच विचाराचा भाजपचा आमदार मतदारांनी निवडून द्यावा. लातूरच्या मार्केट यार्डात जे घडते त्याचे प्रतिसाद शहर व तालुक्यात उमटतात असे सांगून मला विजयी करा असे लाहोटी म्हणाले.
नागरी समस्या सोडवण्यात याव्यात यासाठी बुऱ्हाणनगरातील ९६० मतदारांनी मतदानावर बहिष्काराचा निंर्णय घेतला आहे. यावर शैलेश लाहोटी यांनी संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार बजावून विरोधकांना त्यांची जागा दाखवावी असे आवाहन केले. बुऱ्हाणनागरातील घरे गेल्या पंधरा वीस वर्षांपासून ग्रामपंचायत हद्दीत आहेत तर मतदानाचा हक्क लातूर शहर महापालिकेचा हद्दीत आहे. यामुळे याभागात वीज, रस्ते, पाणी, गटारी अशा समस्या आहेत. स्थानिक आमदार या भागात कधीच आले नाहीत. तुम्ही तरी या नागरी समस्या सोडवाव्यात अन्यथा आम्ही या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकू असे निवेदन लाहोटी यांना देण्यात आले होते. या संदर्भात बुऱ्हाणनगरात कॉर्नर बैठकीत लाहोटी म्हणाले की भाजप जातीवादी नाही. शहरात क्रीडा संकुल, एक सुसज्ज नाट्यगृह, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शादीखाना सर्व समाजासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिल्याचे सांगून आम्ही विशिष्ट समाजाला आमची जहागिरी समजत नाही. आम्ही विकासाचे राजकारण करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सब का साथ सब का विकास या संकल्पनेतून सर्वांना २०२२ पर्यंत सर्वाना घरे मिळणार असल्याचे ते म्हणाले.
पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे समिकरण काँग्रेसने आजवर राबवले. पाच वर्षाला एकदा सत्ता मिळवून मुंबईत राहणाऱ्या आमदाराला त्याची जागा दाखवा, असे मत अजित पाटील कव्हेकर यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की मुंबईत राहून पर्यटनासाठी लातूरला येणाऱ्या काँग्रेस आमदारांचा यावेळी मतदारच पराभव करतील. महायुतीचे उमेदवार लाहोटी यांना विजयी करा. यावेळी आडत व्यापारी आघाडीच्या वतीने पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचे वितरण करण्यात आले. प्रारंभी महायुतीचे उमेदवार शैलेश लाहोटी यांनी मार्केट यार्डात गौरीशंकर मंदिर व हनुमान मंदिरात दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.
Comments