लातूर: लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, रिपाइं (गवई), रिपाइं (कवाडे), शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना महाआघाडीचे अधिकृत उमेदवार धीरज देशमुख यांच्या प्रचारार्थ मुरुड येथे अभिनेते रितेश देशमुख यांच्या उपस्थितीत प्रचार रॅली आयोजित केली होती. या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मतदारांचा हा प्रतिसाद पाहता मुरुडमध्ये विजयी रॅलीची प्रचिती आली, असे रितेश देशमुख म्हणाले. यावेळी त्यांनी आमदार अमित देशमुख आणि धीरज देशमुख साहेबांचा वारसा भक्कमपणे चालवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळ धनंजय देशमुख, नाथसिंह देशमुख, विजय देशमुख. बबन ढगे, अमर मोरे, बी. एस. पठाडे, बी. बी. देवकर, राजेंद्र मस्के, दीपक पठाडे, जीवन चव्हाण, भारत लाड, गुलाबभाई बागवान, आशीफ बागवान, बालाजी खराटे, गोविंद खराटे, प्रथमेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. तरुणांचा जोश पाहून पुढचा आमदार कोण होणार, हे सांगावे लागत नाही, असे सांगत रितेश देशमुख पुढे म्हणाले की, धीरज हे अमित यांच्याही पुढे जातील. ही जोडी येथे विकासाचे पीक आणतील, याची मला खात्री आहे. शिवराज पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख, दिलीपराव देशमुख यांच्या विकासाचा वारसा घेऊन धीरज पुढे आला आहे. सर्व धर्मसमभाव ही भावना घेऊनच काँग्रेस पक्ष पुढे जात आहे. धीरजभैया यांना जनतेच्या आग्रहास्तव पक्षाने उमेदवारी दिली आहे. पक्षाने सर्वे करूनच ही उमेदवारी दिली, तर विरोधकांनीही सर्वे करूनच आपली उमेदवारी मागे घेऊन मित्र पक्षाला जागा सोडली, असेही ते म्हणाले.
मुरुडकरांनी नेहमीच कॉंग्रेसची ताकद वाढवली
मुरुडकरांनी नेहमीच काँग्रेसची ताकद वाढवली आहे. त्यामुळे आताही मुरुडमध्ये हाताचा पंजाच चालणार आहे, असा विश्वास कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार धीरज देशमुख यांनी व्यक्त केला.
मुरुडचे प्रलंबित प्रश्न सोडवायचे आहेत. येथील बाजार अत्याधुनिक बनवायचा आहे. पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे. बेरोजगारीचा प्रश्न आहे. त्यामुळे येथे नवे उद्योग कसे उभे राहतील, हे पाहावे लागेल. तसेच रोजगारनिर्मिती ही करावी लागेल. खरे म्हणजे येथील विकास आघाडी सरकारच्या काळातच झाला आहे. काँग्रेस आघाडीच्या जाहीरनाम्यात युवकांसाठी नव्या गोष्टी असणार आहेत. स्थानिक तरुणांसाठी स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध केला जाईल, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना बेरोजगारी भत्ता दिला जाईल, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाईल. यासाठी काँग्रेस महाआघाडीला भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहनही धीरज देशमुख यांनी केले.
Comments