औसा: औसा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असूनही ऐनवेळी भाजपाकडे देऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना वार्यावर सोडत मोठा अन्याय केला आहे. याच्या निषेधार्थ औसा तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी राजीनामे देऊन आपल्या भाजपा सेना युतीच्या या कृतीचा निषेध व्यक्त केला आहे. औसा विधानसभा मतदारसंघ १९९९ ते २००९ या दहा वर्षाच्या काळात शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला गेला. यापुर्वीही हा गड ताब्यात घेण्यासाठी प्रा. सुर्यभान जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी आपले मोलाचे योगदान दिले आहे. यानंतर हा बालेकिल्ला कॉंग्रेसकडून शिवसेनेकडे आला. मतदारसंघाच्या फेररचनेनंतर औसा मतदारसंघात शिवसेनेला एकवेळा पराभव व एकवेळा निसटता पराभव स्विकारावा लागला. मागच्या निवडणुकीतील निसटत्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिवसैनिकांनी यावेळी कंबर कसली होती. तसेच माजी आमदार दिनकर माने यांनीही खुप मेहनत घेतली. पारंपरिक पध्दतीने उमेदवारीची मागणी केली. पण २०-२५ वर्षे पक्षात पदाधिकार्यांना डावलून कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय केला आहे. तसेच या मतदारसंघात शिवसेनेचे प्राबल्य असतानाही भाजपाला उमेदवारी दिल्याने शिवसैनिकांचा स्वाभिमान दुखावला गेला आहे. त्याचबरोबर महायुतीने शिवसेना व भाजपातील स्थानिक खंबीर व निष्ठावंतांना डावलत उपर्याला उमेदवारी देऊन तालुकावासियांचा अपमान केला आहे. या कृतीच्या निषेधार्थ औशाचे उपप्रमुख किशोर भोसले, तालुका समन्वयक किशोर जाधव, युवा सेना उपप्रमुख दिनेश जावळे, उपतालुका प्रमुख प्रवीण कोव्हाळे, अमोल सुर्यवंशी, सोशल मिडिया तालुका प्रमुख विजय पवार, गोकुळ यादव, माजी युवा सेना सर्कल प्रमुख अली बागवान, शहर संघटक साईनाथ देडे, मुस्तकीन बागवान, राहूल मोरे, पंकज पाटील आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले सामुहिक राजीनामे देऊन अपक्ष उमेदवार बजरंग जाधव यांना बिनविरोध पाठिंबा दिला असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
Comments