लातूर: कलेमुळेच माणूस समृध्द होतो, माणसाचे जीवन सुसह्य करते ती कला. पण आपल्याकडे कला हा विषय नेहमीच तळाशी असतो. दुर्दैवाने आपल्याकडे या कला दुर्लक्षित आहेत. विविध दॄश्य-कला आपण शिकवत असलेल्या विषयांशी जोडून घेणे आवश्यक आहे. मुलांमध्ये कलाविषयक जाणिवा रुजवणे गरजेचे आहे. मुलांना वाढविताना, शिकविताना कलेच्या जाणिवा त्यांच्यात झिरपायला हव्यात, असे मत प्रसिध्द लेखिका, चित्रकार माधुरीताई पुरंदरे यांनी व्यक्त केले.
पुण्याच्या ललित कलाघर संस्थेची लातुरातील कार्यशाळा श्रीकिशन सोमाणी विद्यालयात झाली. कलाकारी कार्यशाळा घेण्यात आली. १८ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर दरम्यान विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या दोन स्वतंत्र कार्यशाळा घेण्यात आल्या. या कार्य शाळेत माधुरीताई पुरंदरे, पुरातत्वशास्त्र तज्ज्ञ अनघा भट आणि नृत्य मार्गदर्शक श्रीनिवास काटवे यांनी मार्गदर्शन केले. भारतीय नृत्य परंपरा, चित्रकला, मातीकाम, संगीत, उत्खनन, वेशभूषा अशा कलांची ओळख कार्य शाळेत करुन देण्यात आली. आपल्या आजुबाजुच्या परिसरात विविध गोष्टी असतात त्याचे निरिक्षण कसे करायचे हे जाणून घेताना मुलांनी आपल्या सहकार्याचे निरिक्षण करुन चित्र काढले. इतिहास हा फ़क्त मोठ्या व्यक्तींचा नसतो तर आपलाही असतो. हे समजून घेताना मुलांनी आपली लहानपणची आठवण कागदावर काढून मातीच्या मूर्तीमध्ये साकारली. भारतीय नृत्य परंपरा माहित करुन घेत नृत्याचे पदन्यास केले. आपण दिवसभरात विविध आवाज ऐकतो. त्या प्रत्येकाची काय भाषा असते हे मुलांनी जाणून घेतले. एवढेच नाही तर आपल्या शरीराचा वापर करून कोणकोणते आवाज निघू शकतात याचा अनुभव मुलांनी घेतला. कथा ऐकता ऐकता त्यातील पात्रांच्या वेषभूषा त्यांनी तयार केल्या. उत्खनन म्हणजे काय याची माहिती घेताना मुलांनी प्रत्यक्ष उत्खनन करून विविध गोष्टी शोधल्या, तर फ़ार पूर्वीच्याकाळी मानवाने गुहेत कशी चित्र काढली असतील याचा विचार करत गुहेत जाऊन चित्र काढली, डोळे बंद करुन संगीताचा अस्वाद घेत रांगोळी साकारली. अशी विविध प्रात्यक्षिके, चित्रफ़िती, चर्चा यातून दॄश्यकला समजून घेतली. तर शिक्षकांनी मुलांना कशात नि कसा आनंद मिळतो ते जाणून घेण्यासाठी विविध गोष्टी करून पाहिल्या. रेषांची भाषा, त्यांचे स्वभाव असतात त्याचा अनुभव घेतला. इतिहासाचा अंतर्भाव कुठे कुठे होतो याचा विचार करून इतिहास म्हणजे आपल्या जगण्याचा एक भाग आहे याची माहिती शिक्षकांनी घेतली. एखाद्या घटनेची विद्यार्थी कशी फ़ोड करतात याचा शोध शिक्षकांनी घेतला पाहिजे, असे मत तज्ज्ञांनी मांडले. डोळे बंद करुन कागदावर रांगोळी साकारताना आपण स्वत:च्या सामर्थ्याचा अंदाज घेतो का याचा शोध शिक्षकांनी घेतला. उत्खनन म्हणजे फ़क्त इतिहासच नाही तर सर्वच विषयांचा समावेश त्यात असतो. ते बघायाला शिकले पाहिजे याचा अनुभव शिक्षकांनी घेतला. आपल्या संवेदना जागृत ठेवा, असे माधुरीताईंनी शिक्षकांना आवर्जुन सांगितले. मुलांना मोकळं होण्याची संधी द्या, असे अनघाताईंनी सांगितले. कार्यशाळेत या विद्यालयाबरोबरच इतर शाळेतील एकूण २९ विद्यार्थी तर २५ शिक्षक सहभागी झाले होते. कार्यशाळेच्या प्रारंभी संस्थेचे सचिव कमलकिशोर अग्रवाल, संस्थेच्या समन्वयक सुनीता बजाज यांनी अतिथींचे स्वागत केले. अशा कार्यशाळा यापुढे नियमित घेतल्या जातील असे कमलकिशोर अग्रवाल यांनी आवर्जुन सांगितले. अशी कार्यशाळा लातुरात होण्यासाठी संस्थेचे मार्गदर्शक पदाधिकारी अतुल देऊळगावकर यांनी पुढाकार घेतला. कार्यशाळेस संस्था कोषाध्यक्ष जयेश बजाज, लातूर मनपाचे माजी आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, डॉ. अजित जगताप, सविता नरहरे, हरीश कुलकर्णी आदी मान्यवरांनी भेट दिली. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे पर्यवेक्षक गिरिश कुलकर्णी, संजय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली कला शिक्षक सागर माडकर, संगीत शिक्षक परमेश्वर शिंदे सहशिक्षकांसह सर्व कर्मचारीवृंदांनी परिश्रम घेतले.
Comments