HOME   लातूर न्यूज

आघाडीचा फायदा, भाजपचे नुकसान

अमित देशमुख, धीरज देशमुख विजयी, संजय बनसोडेंना लॉटरी


आघाडीचा फायदा, भाजपचे नुकसान

लातूर: बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल अतिशय अनपेक्षित आणि रंजक ठरला. राज्यात भाजपाच्या जागा कमी झाल्या तशाच लातुरच्याही एका जागेवर भाजपाला पाणी सोडावं लागलं. लातूर, लातूर ग्रामीण, अहमदपूर आणि उदगीर या ठिकाणी आघाडीचे अनुक्रमे आ. अमित देशमुख, नवखे उमेदवार धीरज देशमुख, बाबासाहेब पाटील, आणि संजय बनसोडे यांची वर्णी लागली.
लातुरात अमित देशमुखसाबकी सीट खतरेमे है असा प्रचार झाला. देशमुखांनाही मोठी कसरत करावी लागली. त्यांचे मताधिक्य कमी झाले. राजा मनियार यांनी २४ हजारांहून अधिक मते मिळवली. त्यांनी अमित देशमुख यांच्या मतांना कात्री लावली. शैलेश लाहोटी थोड्याफार फरकाने आपला मतदार टिकवू शकले.
ग्रामीण मतदारसंघात समोर तगडा उमेदवारच नसल्यानं धीरज देशमुख यांना लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळाले. या मतदारसंघात २६ हजार ८९९ इतकी मते नोटाला पडली. हाही एक विक्रमच आहे.
उदगीर मतदारसंघात सुधाकर भालेरावांना तिकिटापर्यंत पोचता आले नाही. नवख्या आणि आयात केलेल्या डॉ. अनिल कांबळे यांनी तिकिट पळवलं. परिणामी राष्ट्रवादी म्हणजेच आघाडीचे उमेदवार संजय बनसोडे यांची लॉटरी सुकर झाली. निलंग्यात संभाजीरावांनी गड राखला पण वंचितच्या भातांब्रे यांनी कॉंग्रेसच्या मतांना सुरुंग लावला. भाजपात नव्याने आलेल्या विनायकरावांना बाबासाहेब पाटलांनी धोबीपछाड दिला. ऐनवेळी भाजपात आलेल्या अनेक उमेदवारांना मतदारांनी जागा दाखवली. तशीच जागा विनायकरावांनाही पाहणे भाग पडले. औशात मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार या नवख्या पैलवानाने बसवराजांना घरी बसवले. त्यांचा नाकर्तेपणा त्यांना नडला असं मतदार सांगतात.


Comments

Top