HOME   लातूर न्यूज

लातुरात मानसरंग चित्रपट महोत्सव

‘स्वर’ची दशकपूर्ती, ‘कासव’, ‘अस्तु’, ‘बाधा’, 'यलो' चित्रपटाचे प्रदर्शन


लातुरात मानसरंग चित्रपट महोत्सव

लातूर: सोसायटी फॉर वेलबिर्इंग अवेरनेस अॅण्ड रिहॉबिलिटेशन अर्थात 'स्वर' या सेवाभावी संस्थेच्या वतीने लातुरात ३० नोव्हेंबर व ०१ डिसेंबर रोजी मानसरंग चित्रपट महोत्सव (फिल्म फेस्टिव्हल) व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थाध्यक्ष व मानसोपचार तज्ञ डॉ. मिलिंद पोतदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
'स्वर', 'अंतरंग' व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र आणि अभिजात फिल्म सोसायटीच्या संयुक्त विद्यमानाने शहरातील दयानंद सभागृहात चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता मोहन आगाशे निर्मित ‘कासव’ दुपारी ०३ वा. ‘अस्तु’ तर ०१ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ०९.१५ वाजता ‘बाधा’ आणि याच दिवशी दुपारी १२.३० वाजता लातूरचे सुपुत्र रितेश देशमुख निर्मित 'यलो' हे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. या महोत्सवात सुप्रसिद्ध कलावंत निर्माते, दिग्दर्शक डॉ. मोहन आगाशे, दिग्दर्शिका सुमित्रा भावे, 'यलो'चे दिग्दर्शक महेश लिमये व त्यातील कलावंत गौरी गाडगीळ आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. हे कलावंत चित्रपटानंतर प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. ‘स्वर’ ही लातूर मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणारी सेवाभावी संस्था मागील दहा वर्षापासून लातूर व परिसरात कार्यरत आहे. संस्थेच्या दशकपूर्ती निमित्त आयोजित मानसिक आरोग्य या संकल्पनेवर आधारित या अनोख्या चित्रपट महोत्सवात मानवी मनाचे विविध कंगोरे, वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक, मानसिक आरोग्याच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणार्‍या आणि रोजच्या जगण्यात विविध कारणांनी निर्माण होणारे ताणतणाव प्रसंगी मानसिक आजार त्यांच्याकडे पाहण्याचा मी खूप निकोप दृष्टीकोन, स्वतःचा व इतरांचा विनायक स्विकार व पर्यायाने वैयक्तिक, सामाजिक सुदृढ मानसिक आरोग्याचा कानमंत्र देणाऱ्या निवडक चित्रपटांचा या महोत्सवात समावेश करण्यात आला आहे, अशी माहितीही डॉ. पोतदार यांनी यावेळी दिली. अनेक मान्यवर चित्रपट कलावंत व दिग्दर्शकांच्या उपस्थित हा महोत्सव रंगणार असून चित्रपट महोत्सव विनामूल्य असेल. चित्रपटाच्या दरम्यान कलाकार दिग्दर्शक यांच्यासमवेत चर्चासत्र होईल. प्रवेश विनामूल्य असला तरी नोंदणी करणे व प्रवेशिका असणे बंधनकारक आहे. सावली सेंटर ऑफ मेंटल हेल्थ, दयानंद महाविद्यालय समोरील श्री न्यूरोकेअर, देशिकेंद्र विद्यालय शेजारील पोद्दार हॉस्पिटल, बस स्थानकासमोरील संतुलन मानसोपचार केंद्र, औसा रोडवरील संजय क्वालिटी रेस्टॉरंट, तापडिया मार्केट मधील फायब्रोप्लास्ट या ठिकाणी प्रवेशिका उपलब्ध असतील. संस्थेच्या उद्दिष्टाविषयी व मोहिमेविषयी डॉ. मिलिंद पोतदार यांनी माहिती दिली. मानसिक आजाराविषयी व त्यांच्या उपचाराविषयी जनजागृती करणे, आजारी रुग्णांना योग्य शस्त्रक्रिया व उपचारासाठी प्रवृत्त करणे, मानसिक आजाराविषयी असलेला कलंकित दृष्टिकोन बदलून एक आरोग्यदायी दृष्टिकोन समाजामध्ये निर्माण करणे, मानसिक आजारी व व्यसनाधीन व्यक्तींना उपचाराद्वारे परत समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे व त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणे आदी उपक्रम संस्थेमार्फत राबवले जातात. या पत्र परिषदेला डॉक्टर अशोक आरदवाड, डॉ. मुग्धा पोतदार, जितेंद्र पाटील, अभिजात फिल्म सोसायटीचे सचिव श्याम जैन उपस्थित होते.


Comments

Top