लातूर: राष्ट्रसेविका समितीच्या द्वितीय प्रमुख संचालिका स्व. सरस्वतीताई आपटे यांचे २५ वे स्मृतिवर्ष व लातूर शहर संचलनाच्या १२ व्या म्हणजे तपपूर्ती निमित्त देवगिरी प्रांतातील १४ जिल्ह्यांतील राष्ट्रसेविकांचे सघोष पथसंचलन रविवारी लातुरात वातावरणात पार पडले. या सघोष पथसंचलनात एकूण ०१ हजार २७६ गणवेशधारी सेविका सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाई येथील सोमेश्वर हॉस्पिटलच्या स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. सारिका शिंदे होत्या. यावेळी राष्ट्रसेविका समितीच्या पश्चिम क्षेत्र कार्यवाहिका सौ. सुनंदाताई जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून राष्ट्रसेविका समितीच्या पश्चिम क्षेत्र बौद्धिक प्रमुख डॉ. लीनाताई गहाणे उपस्थित होत्या. राहणार आहेत. त्याचबरोबर याप्रसंगी राष्ट्रसेविका समितीच्या लातूर जिल्हा कार्यवाहिका सौ. जगदेवी लातूरे, देवगिरी प्रांत कार्यवाहिका रत्नाताई हासेगांवकर, देवगिरी प्रांत बौध्दिक प्रमुख सौ. नंदा कुलकर्णी, शाखा प्रमुख सौ. किर्ती थिगळे, संपर्क प्रमुख सौ. लताताई देशपांडे, गीत प्रमुख सौ. ज्योती रहाटीकर, तरुणी संपर्क प्रमुख सौ. स्वातीताई अनारगट्टे, सह बौद्धिक प्रमुख श्रीमती विजयाताई कुलकर्णी, सहतरुणी संपर्क प्रमुख सौ. निलीमा वाडगांवकर, कार्यालय प्रमुख सौ. छायाताई देशपांडे, सह शारीरिक प्रमुख कु. स्वाती तळेकर, निधी प्रमुख सौ.अंजली पळणीटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित राष्ट्रसेविकांना मार्गदर्शन करताना डॉ. वीणाताई गहाणे म्हणाल्या की, या सामूहिक पथसंचलनाच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शनाबरोबरच स्वतःबाबतचे आत्मपरीक्षण करणे शक्य होते. स्वतः घेतलेल्या प्रशिक्षणाने तसेच साधनेने समाजावर प्रभाव पडतो. हे राष्ट्रोद्धाराचे कार्य असल्याचे त्यांनी सांगितले. पथसंचलनामध्ये सूचना देण्यात येतात. या सूचनापालनाचा प्रभाव समाजावर पडतो. हा प्रभाव तात्पुरता नसावा तर तो कायम टिकवण्यासाठी प्रभावाचे रूपांतर परिणामात होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वतःच्या, समाजाच्या उत्थानासाठी सगळ्यांनी मिळून चालू या, असेही त्या म्हणाल्या. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना डॉ. सारिका शिंदे यांनी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रत्येकाने अशा प्रकारच्या उपक्रमांत खारीचा वाटा उचलावा असे सांगितले. २१ व्या शतकातही महिलांना विसावा नाही. त्यांना अजूनही हिंसाचाराचा सामना करावा लागतो. महिलांच्या प्रश्नांसाठी केवळ कायदे करून भागत नाही तर त्यासाठी महिलांची चळवळ वाढणे गरजेचे असल्याचे संगितले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक श्रीमती रत्नाताई हासेगांवकर यांनी केले. सुत्रसंचलन सौ. माधुरीताई पूर्णपात्रे यांनी तर आभार प्रदर्शन नंदाताई कुलकर्णी यांनी केले. सौ. श्रुती देशमुख यांनी वैयक्तिक गीत तर सौ. भावना मुळे यांनी सांघिक पद्य सादर केले. मारवाडी राजस्थान विद्यालयापासून सुरु झालेले हे पथसंचलन देशिकेंद्र विद्यालय, शिवाजी चौक, मेन रोड, तहसिल कार्यालय, अशोक हॉटेल, मिनी मार्केट आणि परत मारवाडी राजस्थान विद्यालय मार्गावरून करण्यात आले. या सघोष पथसंचलनाने लातूरवासियांचे लक्ष वेधून घेतले.
Comments