लातूर: देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे थकीत कर्जांचे (NPA) वाढते प्रमाण पाहता बँकांचा समोर वसुलीचे आव्हान ठळकपणे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर बँक ऑफ महाराष्ट्र व्यवस्थापनाच्या वतीने कर्ज वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. बँकेतील पैसा हा सर्वसामान्य लोकांचा पैसा आहे, घेतलेली कर्ज वेळेत परत केली तरच बँकेचा नफा वाढेल म्हणून थकित कर्जाच्या वसुलीसाठी आम्ही वेगवेगळ्या उपाययोजना करत आहोत, असे बँक ऑफ महाराष्ट्र लातूर क्षेत्राचे क्षेत्रीय प्रबंधक श्री भगूरकर यांनी सांगितले.
याचाच एक भाग म्हणून लातूर शहरातील महा बँक कर्मचारी अधिकाऱ्यांनी शहरातून बाईक रॅली काढून थकबाकीदारांच्या घरासमोर निदर्शने केली. या मूक निदर्शनात अधिकाऱ्यांच्या हातात फलक होते, त्यावर आपण घेतलेले कर्ज वेळेवर भरा व समाजात ताठ मानेने फिरा, होय मी भारताचा देशभक्त नागरिक आहे; त्यामुळे कर्ज परतफेड करणे हे माझे कर्तव्य आहे, राष्ट्रीयीकृत बँक ही देशाची संपत्ती, कर्ज परतफेड करून दाखवू हीच आपली देशभक्ती, थकबाकी राहणे जगणे लाजिरवाणे असा मजकूर लिहिला होता. याच प्रमाणे जोपर्यंत कर्ज वसुली होत नाही तोपर्यंत निदर्शने करण्यात येणार आहेत. लातूर प्रमाणेच संपूर्ण भारतभर कर्ज वसुली मोहीम राबविण्यात येणार असून येणाऱ्या काळात योग्य ती पावले उचलली जाणार आहेत अशी माहिती भगूरकर यांनी दिली. या निदर्शने कार्यक्रमात महाबँकेचे क्षेत्रीय प्रबंधक भगूरकर, मुख्य प्रबंधक दीपक पाटील, साडेगावकर, सुब्रह्मण्यम, संदीप आव्हाड, रामचंद्रन तसेच शहरातील सर्व महाबँक कर्मचारी अधिकाऱ्यांनी सहभागी झाले होते.
Comments