HOME   लातूर न्यूज

दीपक कराड ठरला मल्हार केसरीचा मानकरी

खंडोबा यात्रेनिमित्त आज महाप्रसादाचे आयोजन


दीपक कराड ठरला मल्हार केसरीचा मानकरी

लातूर: येथील जय मल्हार खंडोबा देवस्थान यात्रा उत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित कुस्ती स्पर्धेत रामेश्वर येथील दीपक कराड मल्हार केसरीचा मानकरी ठरला. याच गावचा भरत कराड याने तलवार पटकावली. विजेत्यास अकरा तोळे चांदीचे कडे प्रदान करण्यात आले .यात्रा महोत्सवानिमित्त रविवारी ०१ रोजी दुपारी १२ ते ५ या कालावधीत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी दुपारी १ वाजता कुस्ती स्पर्धेला प्रारंभ झाला. बसवेश्वर महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत लातूरसह बीड, उस्मानाबाद, नांदेड आणि सोलापूर जिल्ह्यातील जवळपास ६५० स्पर्धकांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे महिला स्पर्धकांचाही या स्पर्धेत सहभाग होता .मानाची कुस्ती रामेश्वर येथील दीपक कराड व बीडचा विकास मुंडे यांच्यात झाली. यात दीपक कराड याने मुंडे यास घिसा डाव टाकून चितपट केले. दीपक यास ॲड .आशिष बाजपाई यांच्या सौजन्याने ११ तोळे चांदीचे कडे ,रोख रक्कम ,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. द्वितीय पारितोषिक तलवारीसाठी रामेश्वरचा भरत कराड व बोरगाव येथील बालाजी साळुंके यांच्यात लढत झाली .भरत कराड विजेता ठरला . विजेत्यांना मन्मथ लोखंडे ,माजी नगरसेवक किशोर राजुरे, पोलीस उपनिरीक्षक सागेवाड , बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य लखादिवे यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले. या स्पर्धेचे पंच म्हणून हनुमंत लोंढे, दगडू लांडगे, शेषराव महानवर, रोहिदास माने, भैय्या पाटील, तुकाराम मरे व समालोचक म्हणून रामभाऊ देवकते यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी यात्रा संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी लातूर व परिसरातील हजारो नागरिकांनी व कुस्तीप्रेमींनी गर्दी केली होती. यात्रा उत्सवानिमित्त रविवारी दुपारी १२ ते ५ या कालावधीत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


Comments

Top