लातूर: गौरी गाडगीळ या मुलीच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यावर तयार झालेला ‘यलो’ हा चित्रपट पाहण्याचा व तिला पाहण्याचा, तिला ऐकण्याचा दुर्मिळ योग लातूरकर रसिक प्रेक्षकांना रविवारी आला. तुम्ही करू शकता (यू कॅन डू इट) असा संदेश देत गौरीने प्रेक्षकांशी संवाद साधला तेव्हा प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करीत दयानंद सभागृह डोक्यावर घेतले. स्वर, अंतरंग या सेवाभावी संस्थांनी अभिजात फिल्म सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने लातूर दोन दिवसीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी डॉ. मोहन आगाशे निर्मित कासव, अस्तू हे दोन आशयघन चित्रपट दाखवण्यात आले. शेवटच्या दिवशी बाधा आणि लातूरचा सुपुत्र रितेश देशमुख, उत्तुंग ठाकूर निर्मित 'यलो' हा चित्रपट दाखविण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश लिमये, कलाकार गौरी गाडगीळ आणि गौरीची आई स्नेहा गाडगीळ यांनी एका चर्चासत्रात रसिक प्रेक्षकांशी तासभर संवाद साधत त्यांना जागेवरच खिळवून ठेवले. रविवार सुटीचा दिवस असल्याने गौरीला पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी शेकडो रसिकांनी तोबा गर्दी केली होती. जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन संदेश देणारे चित्रपट पाहून निर्माता, दिग्दर्शक व कलावंतांना पाहून, ऐकून लातूरकर रसिक भारावून गेले होते. चित्रपट महोत्सवाच्या संयोजनाबद्ल सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मिलिंद पोतदार यांनी आपली भूमिका विशद करताना सांगितले की, मानसिक आरोग्याबद्दल जाणीव-जागृती वाढावी लोकांनी जीवनाचे तत्त्वज्ञान जगाला शिकावे यासाठी हा सगळा खटाटोप केला. सगळ्यांच्या सहकाऱ्यांनीहा महोत्सव यशस्वी झाला. अभिजात फिल्म सोसायटीचे शाम जैन यांनी आभार मानले.
Comments