लातूर: शहरात मागील काळात डेंग्यू, चिकनगुनिया व साथीच्या आजाराने जोर धरला आहे. शहरातील प्रत्येक घरात किमान एक तरी रुग्न या आजारांनी पिडीत आहे. सर्वसामान्यांना यामुळे अडचणीचा सामना करावा लागत हि बाब लक्षात घेत आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी पुढाकार घेत सर्व प्रमुख अधिका-यांची बैठक घेवून येत्या ३० दिवसात लातूर शहर पूर्णपणे साथीच्या आजारापासून मुक्त करण्याचा निर्धार केला आहे. या बैठकीस मनपा आयुक्त एम. देवेंद्रसिंह, आरोग्य उपसंचालक डॉ. माले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे, शासकिय वैदयकीय महाविदयालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर, उपअधिष्ठाता डॉ.मंगेश सेलूकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. परगे, इंडियन मेडिकल असोशिएनचे अध्यक्ष डॉ. अजय जाधव, आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत माले, डॉ. सुहास गोरे, उपायुक्त संभाजी वाघमारे, हर्षल गायकवाड, सह आयुक्त वसुधा फड, डॉ. नरेंद्र पाटील, मुख्य स्वच्छता निरीक्षक सुर्यकांत राऊत, आस्थापना विभाग प्रमुख रमाकांत पिडगे उपस्थित होते.
बैठकीत सर्व बाजुंनी चर्चा होवून दररोज प्रत्येक प्रभागात सर्व यंत्रणा एकत्रित राबविण्यात येणार असून यानिमित्त सर्व भागाची नाले सफाई, धूर फवारणी, औषध फवारणी, अबेटिंग करण्यात येणार आहे. तसेच विशेष वैदयकीय पथकही कार्यरत राहणार आहे. नागरीकांनी यंत्रणांना सहकार्य करण्याचे अवाहन महापौर, उपमहापौर व सर्व नगरसेवकांच्या वतीने करण्यात आले.
निशुल्क रक्त तपासणीचा लाभ घ्यावा– महापौर
नागरीकांनी ताप, डोकेदुखी, अंगदुखी जाणवल्यास नजिकच्या मनपा आरोग्य केंद्रावर जाऊन महालॅबच्या माध्यमातून निशुल्क रक्त तपासणी करुन घ्यावी. डेंग्यू रक्त तपासणी अगदी नाममात्र शुल्कात शासकीय वैदयकीय महाविदयालय येथे उपलब्ध करण्यात आली आहे. नागरीकांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले. शहरातील साथीच्या आजारांवर नियंत्रण आणण्याकरीता नियंत्रण समिती गठित करण्यात आली. यामध्ये महापौर, उपमहापौर, मनपा आयुक्त, आरोग्य उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, शासकिय वैदयकीय महाविदयालयाचे अधिष्ठाता यांचा समावेश राहणार आहे. ही समिती दररोज सर्व कामकाजाचा व नागरिकांच्या तक्रारींचा आढावा घेणार आहे. पुढील ३० दिवसात दररोज ०२ प्रभाग स्वच्छता विभागाचे १०० हून अधिक कर्मचारी, ०९ डॉक्टर्स, ८० आरोग्य कर्मचारी एकत्रितपणे यंत्रणा राबविणार आहेत.
Comments