HOME   लातूर न्यूज

लाईट आली अन कचरा डेपोचं गेट निघालं!

वरवंटीत शेतकर्‍यांनी डेपोला ठोकलं होतं कुलूप, कायमस्वरुपी मार्गच निघेना


लाईट आली अन कचरा डेपोचं गेट निघालं!

लातूर: लातूर शहरातील कचरा ज्या ठिकाणी साठवला जातो तो हा वरवंटीचा कचरा डेपो. या ठिकाणची कचरा साठवण्याची क्षमता केव्हाच संपली आहे. या डेपोमुळे आजुबाजुची शेती नासत आहे, पाण्याचे स्रोत दूषित होत आहेत. या ठिकाणी जमणारी श्वापदं जनावरांना फाडत आहेत आणि विशेष म्हणजे या भागात विजेचाही पत्ता नव्हता. त्रासलेल्या ग्रामस्थांनी या कचरा डेपोच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप घातलं आणि कचरा वाहून नेणारी वाहनं जागीच थांबली. या भागातील ग्रामस्थांना मनपा वीजपुरवठा करते. बील न भरल्याने वीज गायब झाली. दोन दिवसांनी बील भरलं गेलं. वीज आली आणि ग्रामस्थांनी कचरा डेपोच्या प्रवेशद्वाराचं कुलूप काढलं! लातूर महानगरपालिकेनं कचरा डेपोसाठी नवीन जागा घेतली आहे असं त्यावेळचे आयुक्त तेलंग यांनी सांगितलं होतं. पण या जागेचा थांगपत्ता लागलेला नाही. कचर्‍यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा काय करतेय हेही कळत नाही. या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा निघायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Comments

Top