HOME   लातूर न्यूज

लातूरच्या ज्वारीवर अमेरिकन लष्करी अळीचा हल्ला

अळीचा प्रसार वेगाने, एक पतंग करतो दहा किलोमीटरचा प्रवास, एकावेळी देतो १००० अंडी!


लातूरच्या ज्वारीवर अमेरिकन लष्करी अळीचा हल्ला

लातूर: जिल्ह्यात या वर्षी परतीच्या समाधनकारक पावसामुळे रबी हंगामात ज्वारीचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला असून ज्वारीवर अमेरिकन लष्करी अळीचा (फॉल आर्मीवर्म – स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डां) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याचे मांजरा कृषी विज्ञान केंद्र, लातूर यांच्याकडून सांगण्यात आले आहे. खरीप हंगामात जिल्ह्यात मक्यावर आढळून आलेल्या या अमेरिकन लष्करी अळीने आता रबी ज्वारीकडे मोर्चा वळवला आहे. ही अळी ज्वारीचे पाने कुरतडून पोंग्यामध्ये शिरते व त्यामुळे तिच्या विष्ठेमुळे पानांची प्रत खराब होते. या किडीचा पतंग एकावेळी १००० अंडी पुंजक्यात देतो. त्याचबरोबर एका रात्रीमध्ये एक पतंग १० किलोमीटर अंतर पार करून जातो. त्यामुळे अळीचा प्रसार खूप वेगाने होतो. सध्यस्थितीत जिल्ह्यामधे वेगवेगळ्या कालावधीत पेरणी झाली असल्यामुळे जीवनक्रमातील वेगवेगळ्या अवस्थेतील अळीस पोषक वातावरण मिळत आहे. या परिस्थितीत पिकाचे संरक्षण करण्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांनी प्रादुर्भाव वेळेवर ओळखणे गरजेचे असून ज्वारीच्या पिकाची दररोज निरीक्षणे घ्यावीत. प्रादुर्भाव आढळून आल्यानंतर व्यवस्थापनासाठी सर्वप्रथम पानावरील अंडीपुंज व प्रादुर्भावग्रस्त पोंगे नष्ट करावीत व शिफारशीनुसार स्पिनेटोराम ११.७% एससी ०.५ मिली/लिटर पाण्यात किंवा थायमेथॉक्झाम १२.६ % + लॅम्बडा सायलोथ्रिन ९.५ % ०.२५ मिली/लीटर किंवा क्लोरानट्रानिलिपरोल १८.५ % एससी ०.४ मिली/लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ प्रा. संदीप देशमुख यांनी केले आहे.


Comments

Top