लातूर: महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राट दिलेल्या जनाधार संस्थेच्या ढिसाळ कारभारामुळे लातूर शहराचे कचरा व्यवस्थापन पूर्णपणे मोडकळीस आले आहे. अशा परिस्थितीमध्ये नूतन महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी पदभार स्विकारल्यापासून शहराच्या स्वच्छतेकडे प्रामुख्याने लक्ष देण्यास सुरुवात केली. मध्यंतरी वरवंटी येथील कचरा डेपोला भेट दिली असता कचरा प्रक्रिया प्रकल्प सहा महिन्यापासून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर मनपा आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कंत्राटदारास संपूर्ण शहरातील कचरा व्यवस्थापन सुधारण्याकरिता ३० दिवसांचा कालावधी देत कामात सुधारणा न झाल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा महापौर व उपमहापौर यांनी दिला होता. महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार दररोज शहरभर फिरून कचरा व्यवस्थापन सुधारण्याकडे लक्ष देत आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आज अखेर वरवंटी येथील कचरा डेपोवर असणारा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित झाला. त्यामुळे दररोज कचऱ्यावर प्रक्रिया होऊन त्यापासून खत निर्मिती होणार आहे. तसेच येत्या ३० दिवसांमध्ये शहरात किमान सहा ठिकाणी ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प उभारण्याबाबतही कंत्राटदारास आदेशित करण्यात आलेले आहे. महापौर व उपमहापौर यांच्या प्रयत्नांमुळे शहरातील घनकचरा व्यवस्थापन सुधारताना दिसून येत आहे. असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
महापौर-उपमहापौर व मनपा आयुक्त यांच्या निर्देशानुसार कचरा डेपोवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून मनपा अधिकाऱ्यांना महानगरपालिकेत बसून कचरा डेपोवरील दैनंदिन कामाचा आढावा घेता येणार आहे. यामुळे घनकचरा व्यवस्थापनाची कार्यक्षमता वाढणार असून कंत्राटदारावर जरब बसण्यास मदत होणार आहे.
वरवंटी येथील कचरा डेपो जागेवर यापूर्वीच साठवण्यात आलेल्या कचऱ्यामुळे संपूर्ण जागा व्यापलेली असून नवीन कचरा टाकण्याकरीता जागा उपलब्ध नसल्यामुळे कचरा डेपो करिता अतिरिक्त जागा मिळावी याकरिता एमआयडीसीकडे मागणी करण्यात असल्याची माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी दिली.
Comments