HOME   लातूर न्यूज

तीन सिटी बस लातूरकरांच्या सेवेत, झाल्या १३

महापौर आणि उप महापौरांनी केला प्रवास, घेतल्या अडचणी जाणून


तीन सिटी बस लातूरकरांच्या सेवेत, झाल्या १३

लातूर: लातूरकरांना शहरांतर्गत प्रवास सुखकर व्हावा यासाठी अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न महापालिका सातत्याने करत आहे. याचाच एक भाग म्हणून तीन नव्या सिटी बस लातूरकरांच्या सेवेत रुजू करण्यात आल्या. यापूर्वीच्या १० आणि आता नव्याने रुजू झालेल्या ०३ अशा एकूण १३ सिटीबसच्या माध्यमातून लातूरकरांना शहरातून प्रवास करता येणार आहे. विशेष म्हणजे या सिटीबसचे लोकार्पणस्थळी पोहोचण्यापूर्वी महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी स्वतः सिटीबसमधून प्रवास करत प्रवाशांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
लातूर शहराचा विस्तार वेगाने होत आहे. मागच्या अनेक वर्षांपासून लातूर शहरात अंतर्गत प्रवास कठीण होत असताना शहरातील नागरिकांना सुविधा देण्याचे काम महापालिका करत आहे. शहरातील नागरिकांना प्रवास करण्यासाठी काही वर्षांपूर्वी शहर बससेवा सुरू करण्यात आली. नागरिकांची मागणी आणि या सेवेला मिळणारा प्रतिसाद पाहता बसची संख्या वाढवण्यात आली. शहराची गरज पाहता एकूण २२ बस सेवेत दाखल होणार आहेत. त्यापैकी ०३ नव्या बस शुक्रवारपासुन लातूरच्या रस्त्यावर धावणार आहेत.
महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी आज या तीन बसचे लोकार्पण केले. विशेष म्हणजे या सिटीबसचे लोकार्पण करण्याच्या कार्यक्रमास जाताना महापौर आणि उपमहापौर यांनी स्वतः सिटीबसमधूनच प्रवास केला. प्रवासादरम्यान प्रवाशांशी चर्चा केली. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. आणखी काय सुधारणा करता येतील याबाबत सूचना ऐकून घेतल्या. बस कुठे थांबतात, प्रवाशांना योग्य त्या ठिकाणी उतरवले जाते काय? बसमध्ये क्षमतेप्रमाणे प्रवासी संख्या असते काय याचीही माहिती महापौर व उपमहापौर यांनी घेतली. तीन नव्या बस रुजू झाल्याने शहरांतर्गत प्रवासाची सोय अधिक चांगली होणार आहे . नव्या मार्गावर सिटीबस सेवा सुरू करता येणार असून शहराच्या विविध भागातील नागरिकांना परवडणाऱ्या दरात या माध्यमातून प्रवास करता येणार असल्याची माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी दिली.


Comments

Top