लातूर: लातूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैधव बेकायदेशीर बांधकामे चालू असून अशा कृत्यांवर व असे कृत्य करणाऱ्यांना सहकार्य करणाऱ्या मनपाच्या दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी माजी नगरसेविका तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विधिज्ञ शोभा गोमारे-दुड्डे यांनी मंगळवारी लातूर मनपासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. अवैध बांधकाम प्रकरणी सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपला लढा यापुढेही चालूच राहणार असल्याचा निर्धार गोमारे यांनी व्यक्त केला.
लातूर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे केली जात आहेत. या बांधकामांना दुर्दैवाने मनपातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची साथ व सहकार्य मिळत आहे. त्यामुळे अशा प्रकरणांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला तरीही मनपा प्रशासनाकडून त्याची योग्य ती दखल घेतली जात नाही, असा अनुभव आल्यानंतर गोमारे यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाप्रमाणे मंगळवारी उपोषण करण्यात आले. आपण मनपाकडे ज्या विषयाबाबतची मागणी करतो, त्याऐवजी वेगळ्याच विषयाचे चुकीचे स्पष्टीकरण देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न मनपा प्रशासनाकडून करण्यात आल्याचे निवेदन गोमारे यांनी आपले उपोषण सोडल्यानंतर मनपा आयुक्तांना दिले आहे. त्या निवेदनात त्यांनी मनपातील अधिकारी किती चुकीच्या पद्धतीने काम करून प्रशासन व शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात, हे दर्शविण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. यासंदर्भांत आपणास आयुक्तांनी प्रत्यक्ष भेटीसाठी वेळ दिल्यास आपण अनेक बेकायदेशीर कृत्य सिद्ध करून दाखवू, असेही शोभा गोमारे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. आजच्या या लाक्षणिक उपोषणास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह अनेक संघटना, नागरिकांनी शोभा गोमारे यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.
Comments