लातूर: केंद्र सरकारने देशभरात नुकतेच लागू केलेल्या नागरिकता संशोधन विधेयकाच्या समर्थनार्थ विधेयक समर्थन कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या कायद्याच्या विरोधात दगडफेक, जाळपोळ व राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
वीर योद्धा संघटनेचे महाराष्ट्र प्रमुख श्रीकांत रांजणकर यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांनी भारतीय नागरिकता अधिनियम २०१९ हे विधेयक बहुमताने मंजूर केले आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर देशभरात हा कायदा लागू झाला आहे. आपल्या शेजारी असणाऱ्या पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान आदी देशांमध्ये तेथील बहुसंख्य सामाजाने अल्पसंख्य समाजावर अन्याय, अत्याचार केलेला आहे. या छळामुळे तेथे या समाजाला सन्मानाने जगता येत नाही. त्यामुळे शरणार्थी म्हणून भारतात आलेल्या या शरणार्थीना सन्मानपूर्वक जगण्याचा हक्क देणे हे भारताच्या मानवतावादी संस्कृतीचे कर्तव्यच आहे. यासाठी त्यांना भारतीय नागरिकत्व बहाल करून आपल्या सर्वांसोबत बंधुत्वाच्या नात्याने अभिमानाने जगण्याचा हक्क देणारे हे विधेयक संसदेने बहुमताने मंजूर केले आहे. कोट्यावधी भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे. मानवताधर्माचे पालन करताना सध्या भारताचे नागरिक असणाऱ्या सर्व जातीधर्माच्या नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्याचे रक्षण होईल याची खबरदारी या विधेयकात घेण्यात आलेली आहे. यामुळेच भारताचे नागरिक म्हणून आम्ही या विधेयकाचे जाहीर समर्थन करतो, असे निवेदनात म्हटले आहे.
लोकशाहीच्या मंदिरातून मंजूर करण्यात आलेला हा कायदा लागू झालाच पाहिजे. सर्व भारतवासी राष्ट्राच्या रक्षणासाठी सज्ज आहेत. असंवैधानिक पद्धतीने जे या विधेयकाला विरोध करतील, त्यासाठी जाळपोळ, दगडफेक करून राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करतील त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असेही निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर श्रीकांत रांजणकर यांच्यासह श्रीकृष्ण पाडे, संतोष पांचाळ, नितीन मोहनाळे, कुमार जाधव, दयानंद गव्हाणे आदींसह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Comments