HOME   लातूर न्यूज

लातूरकरांनी अनुभवला सूर्यग्रहण सोहळा

एमडीए फाउंडेशन व रोटरीच्या सहकार्यातून महापालिकेचा अभिनव उपक्रम


लातूरकरांनी अनुभवला सूर्यग्रहण सोहळा

लातूर: लातूर शहर महानगरपालिका, एमडीए फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन यांच्या संयुक्त उपक्रमातून दोन हजार विद्यार्थ्यांनी सूर्यग्रहण महादर्शन सोहळा अनुभवला. क्रीडा संकुलाच्या मैदानावर सकाळी ०७ ते ११ या कालावधीत विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनीही सहभागी होत या वर्षातील हे शेवटचे ग्रहण नजरेत साठवून घेण्याचा प्रयत्न केला. महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांच्या संकल्पनेला प्रा. ओमप्रकाश झुरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली एमडीए फाउंडेशन व रोटरी क्लबची साथ मिळाल्यामुळे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही या सोहळ्यात सहभागी होता आले.
शहरातील महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गुरुवारी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण पाहता यावे यासाठी महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी एमडीए फाउंडेशन कोळपा व रोटरी क्लबच्या सहकार्यातून हा उपक्रम आयोजित केला होता. जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या हस्ते या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन झाले. महापौर-उपमहापौर यांच्यासह रोटरीचे अध्यक्ष शशिकांत मोरलावार, सचिव कपिल पोकर्णा भूगोल अभ्यासक तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी अधिव्याख्याता एनबी रेड्डी, भारतीय विज्ञान प्रसारक पराग गोरे, मोनिका गोरे, मुख्य समन्वयक प्रा.ओमप्रकाश झुरुळे, एमडीए रॉयल इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या श्वेता गिल, एमडीए स्कूल ऑफ फार्मसीचे प्राचार्य आनंद रामासामी, पालिकेचे शिक्षणाधिकारी एच डी सोनफुले यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. भारतीय विज्ञान प्रसारक पराग गोरे यांनी सूर्यग्रहणाची शास्त्रीय माहिती विद्यार्थ्यांना दिली. व्हिडिओ आणि पीपीटीच्या माध्यमातून सूर्यमालिका, सुर्यग्रहणाचे प्रकार, त्याची वैज्ञानिक पार्श्वभूमी आणि अंधश्रद्धा याबाबत मार्गदर्शन केले.
हे ग्रहण पाहता यावे यासाठी एमडीए फाउंडेशनच्या वतीने सिल्वर पॉलिमर ब्लॅक फिल्मचे गॉगल सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात आले होते. क्रीडा संकुलाच्या मैदानावर सूर्याच्या आकारात उभे राहून विद्यार्थ्यांनी सूर्यग्रहण अनुभवले. महापालिका शाळां मधील तसेच एमडीए रॉयल इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी यांच्यासह शहर व परिसरातून ग्रहण पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थी आणि नागरिकांनीही या उपक्रमात सहभाग नोंदवला. हा उपक्रम संपन्न झाल्यानंतर एमडीए स्कुल ऑफ फार्मसीच्या १५० स्वयंसेवकांनी जिल्हा क्रीडा संकुलाचे संपूर्ण मैदान स्वच्छ केले.


Comments

Top