लातूर: नागरिकत्व कायदा, वाढती महागाई, महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना, संकटात सापडलेली भारतीय अर्थव्यवस्थेस जबाबदार केंद्रातील सरकारची चुकीची धोरणे या विरोधात आज शनिवारी मुंबई येथे ‘भारत बचाओ संविधान बचाओ’ फलॅग मार्चचे आयोजन केले आहे. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या सुचनेनुसार काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून ‘भारत बचाओ संविधान बचाओ’ फलॅग मार्चचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सचिव, आ. अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्हयातील सर्व स्तरातील नागरीक, कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठया संख्येने आज शुक्रवारी लातूर येथून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. यात लातूर शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख, जिल्हाध्यक्ष ॲड. व्यंकट बेद्रे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष मोहन सुरवसे, सेवादल अध्यक्ष सुपर्ण जगताप, गोविंद बोराडे, ज्ञानोबा शेडगे, श्रीनीवास शेळके, युवराज जाधव, शरद देशमुख, सुभाष माने, एम.पी. देशमुख यांच्यासह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Comments