लातूर: लातूरसह शेजारच्या बीड, उस्मानाबाद आणि नांदेड या जिल्ह्यातून तिरुपती व अजमेर येथे खाजा गरीब नवाज यांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या हिंदू-मुस्लीम भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु तिरुपती व अजमेर येथे जाण्यासाठी लातूर तसेच मराठवाड्यातून कोठूनही थेट रेल्वे सेवा उपलब्ध नाही. यामुळे लातूरहून तिरुपती व अजमेर येथे जाण्यासाठी साप्ताहिक रेल्वे सुरू कराव्यात, अशी मागणी मध्य रेल्वेच्या महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश झोनल सल्लागार समितीचे सदस्य निजाम शेख यांनी केली आहे.
मध्य रेल्वेच्या सल्लागार झोनल समितीची बैठक मुंबई येथे महाप्रबंधक कार्यालयात संपन्न झाली. महाप्रबंधक संजीव मित्तल यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीस समितीचे सचिव तथा उपमहाप्रबंधक दिनेश वशिष्ठ, सहाय्यक महाप्रबंधक साकेतकुमार, मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांच्यासह रेल्वेचे प्रमुख अधिकारी आणि सदस्यांची उपस्थिती होती. लातूर हे मराठवाड्यात सर्वाधिक वेगाने विस्तारणारे शहर आहे. शिक्षण व उद्योग क्षेत्रात हे शहर आघाडीवर असून कर्नाटक व आंध्र प्रदेशच्या सीमेलगत हा जिल्हा वसलेला आहे. लातूर येथे मेट्रो रेल कोच फॅक्टरी उभारण्याचे काम वेगाने पूर्ण होत आहे. यासह या भागातून तिरुपती व अजमेर येथे जाणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे. उस्मानाबाद, बीड, परभणी, नांदेड या जिल्ह्यातूनही तिरुपती व अजमेरसाठी थेट रेल्वे नाहीत. त्यामुळे भक्तांना रेल्वे बदलत दर्शनासाठी जावे लागते. यात वेळ आणि पैशाचा अपव्यय होतो. भाविकांची मोठी संख्या आणि त्या माध्यमातून रेल्वेला मिळणारे उत्पन्न लक्षात घेता आठवड्यातून किमान एकवेळा तिरुपती व अजमेर येथे गाड्या सोडाव्यात अशी मागणी निजाम शेख यांनी केली. या माध्यमातून भाविकांची सोय होणार असून रेल्वेच्या उत्पन्नातही भर पडणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या रेल्वे सुरू कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.
बिदर- लातूर- मुंबई ही रेल्वे लातूरहून दररोज धावते. या भागातून मुंबईला जाणारी ती एकमेव रेल्वे असल्यामुळे या गाडीला मोठी गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांना तिकीटही मिळत नाही. उभा राहून प्रवास करण्यासाठीही जागा मिळत नाही. त्यामुळे या गाडीला एलएचबी कोच द्यावेत. यामुळे प्रत्येक बोगीमध्ये दहा बर्थ वाढतील आणि तेवढ्याच अधिक संख्येने प्रवासी मुंबईला जाऊ शकतील असेही शेख यांनी सांगितले.
लातुरातील अनेक नागरिक व तरुण दैनंदिन कामासाठी पुणे येथे जातात. अनेक तरुण नोकरीच्या निमित्ताने पुण्यात स्थायिक झाले आहेत .या तरुणांना आणि नागरिकांनाही पुण्याहून जाणे-येणे करण्यासाठी एक मुंबई गाडी वगळता इतर फारशा रेल्वे उपलब्ध नाहीत. त्यामुळे बहुतांश वेळा बस अथवा खाजगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करावा लागतो. यामुळे गैरसोय होते. रेल्वे खात्याने लातूर- पुणे इंटरसिटी चालू केली किंवा लातूर-पुणे अशी फास्ट पॅसेंजर चालू केली तर त्या माध्यमातून रेल्वेचे उत्पन्न वाढू शकते. यासोबतच बिदर-मुंबई या रेल्वेवरील ताण कमी होऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर लातूर-पुणे रेल्वे सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली आहे .
या बैठकीस समितीचे सदस्य सुभाष गुप्ता ,राजेंद्र जोशी ,बिभीषण जाधव ,डॉ. अमन शर्मा , नितीन पांडे ,ओमप्रकाश चव्हाण, वंदना सोनवणे ,बसवंत शुक्ला ,अनिल तलरेजा यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
Comments