लातूर : तंटा मिटवण्यासाठी गेलेल्या नगरसेवक अजय कोकाटे यांना अमानुष मारहाण केल्या प्रकरणी लातुरच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नानासाहेब उबाळे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवदास लहाने या दोघांचीही बदली करण्यात आली आहे. उबाळे यांना नियंत्रण कक्षात तर लहाने यांना औशाला पाठवण्यात आले आहे. परवाच्या दिवशी कापड मील परिसरात मूर्तीचा वाद निर्माण झाल्याने उबाळे आणि लहाने तेथे हजर झाले. या भागातील नागरिकांनी नगरसेवक म्हणून अजय कोकाटे यांना बोलावून घेतले. तूच हे घडवून आणलेस तू कसला लोकप्रतिनिधी असे म्हणत कोकाटेंसह दोघा तिघांना पोलिस गाडीतून शिवाजीनगर ठाण्यात आणले, बेल्टने मारहाण केली, अवमानास्पद वागणूक दिली. हे कळताच मधुकर कोकाटेही तेथे आले त्यांनाही अरेरावीची भाषा ऐकायला मिळाली. एवढेच नव्हे तर ठाण्याच्या बाहेरही काढण्यात आले. कुणाचीही तक्रार नसताना आम्हाला ठाण्यात का आणले अशी विचारणा केली असता एकाकडून तक्रार घेण्यात आली. प्रकरण चिघळत गेले, अनेक नगरसेवक आणि प्रतिष्ठीत मंडळी जमली, सगळ्यांनीच ‘वजन’ वापरले त्यामुळे पोलिस अधीक्षकांना दखल घेत दोघांची बदली करणे भाग पडले.
Comments