लातूर : महावितरणच्या नियमाप्रमाणे अतिरिक्त सुरक्षा ठेव जमा न करणार्या आणि काम बंद ठेऊन वेठीस धरणार्या वीज बील भरणा एजन्सींना काम बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महावितरणची स्टेशनरी व इतर साहित्य महावितरणकडे जमा करण्याच्या सूचना देत वीज बील वसुली बंद करावी अन्यथा, दिवाणी आणि फौजदारी कारवाई करण्यात येईल असेही कळविण्यात आले आहे.
दैनंदिन वीज बिल वसुलीच्या रक्कमेच्या प्रमाणात महावितरणच्या नियमाप्रमाणे अतिरिक्त सुरक्षा ठेव जमा न करण्याच्या संदर्भाने लातूर जिल्हा वीज बिल भरणा केंद्र चालकाच्या संघटनेतील कांही एजन्सीनी चुकीची भूमिका घेत वीज ग्राहकांना वेठीस धरण्याची भूमिका घेतली. मात्र, महावितरणने तात्काळ वीज भरणा केंद्राची पर्यायी व्यवस्था निर्माण केली. पर्यायी केंद्राच्या उपलब्धते बरोबरच ग्राहकांना पिण्यासाठी शुध्द पाणी आणि निवाऱ्याची व्यवस्था करुन देण्यात आल्याने ग्राहकांनी अक्षरश: रांगा लावत वीज बील भरणा कायम ठेवला आहे. महावितरणच्या केंद्रावर तत्पर सेवा आणि योग्य समुपदेशन करण्यात येत असल्याने रांगेतील ग्राहकांनी समाधान व्यक्त केले असल्याची माहिती मुख्य अभियंता राजाराम बुरुड यांनी दिली. महावितरणने दैनंदिन वीज बील वसुलीच्या रकमेच्या प्रमाणात नियमाप्रमाणे अतिरिक्त सुरक्षा ठेव जमा न करण्याच्या संदर्भाने सर्व एजन्सींना नोटीसा दिल्या. मात्र, अतिरिक्त सुरक्षा ठेव जमा न करता १० नोव्हेंबरपासून काही एजन्सीनी वीज बील भरणा केंद्र बंद ठेवण्याची भूमिका घेतली. त्यावर ग्राहकांच्या सोयीसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून महावितरणतर्फे सर्व सोयीनी युक्त अशी सुसज्ज यंत्रणा उभारण्यात आली. त्यात पिण्याचे शुध्द पाणी व महावितरणच्या मोबाईल ऍ़प मार्फत व www.mahadiscom.in या संकेतस्थळावरुन वीज बील भरण्यासाठी ग्राहकांचे समुपदेशन करण्यात आले. त्यामुळे ग्राहकांनी रांगा लावून समाधान व्यक्त करित वीज बिलांचा भरणा केला असे महावितरणच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
Comments