लातूर : २३ व्या जीएसटी कॉन्सिलने दोनशेहून अधिक वस्तूंच्या जीएसटी दरात कपात केल्याने मराठवाडा महासंघाने समाधान व्यक्त केले आहे. दर कमी केल्याने पंतप्रधान केंद्रीय अर्थमंत्री, मुख्यमंत्री, राज्याचे अर्थमत्री यांच्या अभिनंदनाचा ठराव महासंघाचे अध्यक्ष दिनेश गिल्डा यांनी घेतला आहे. मराठवाडा व्यापारी महासंघाच्या माध्यमातून अनेक सूचना राज्य सरकारला करण्यात आल्या होत्या. या सूचनांचा आदर राज्याच्या अर्थमंत्र्यांनी करुन काही सूचनांची अंमलबजावणीही केली आहे. त्यांच्याकडून अनेक वस्तुंची जीएसटी कमी केली आहे. मध्यंतरी अनेक वस्तूंचे दर १८ टक्के मध्ये आले होते, त्यांची पूर्वीची एक्साईज डयुटी, व्हॅट एन्ट्री कर मिळून २३ टक्के ते २५ टक्के स्लॅबमध्ये जात होते. त्यांना जीएसटी कॉन्सीलने २८ टक्के आणले मात्र सदर दर जास्त असल्याचे मराठवाडा व्यापारी महासंघाच्या माध्यमातून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निर्दशनास आणून दिले होते. ग्राहकपयोगी व दैनंदिन वापरावयाच्या वस्तुंचे दर कमी करण्याची मागणी लावून धरण्यात आली होती. या मागणीकरिता विविध माध्यमातून पाठपुरावा केल्याने वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) दरात मोठे फेरबदल होवून दैनंदिन वापरातील १७७ वस्तूंवरील जीएसटी २८ टक्क्यांऐवजी १८ टक्क्यांपर्यत आणली आहे. तर १३ वस्तूंचे दरही १८ टक्केवरुन १२ टक्के करण्यात आले. ६ वस्तूंचे दर १८ वरुन ५ टक्के व ८ वस्तुंचे दर १२ वरुन ५ टक्के करण्यात आले आहेत. यामुळे शासनाचा हा निर्णय व्यापारी, उद्योजक आणि ग्राहकांना दिलाासा देणारा ठरलेला आहे. हा निर्णय अभिनंदनास पात्र असल्याने मराठवाडा व्यापारी महासंघाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारच्या अभिनंदनाचा ठराव अध्यक्ष दिनेश गिल्डा यांनी घेतला आहे.
Comments