लातूर: शहरात महाऊर्जा विभागीय कार्यालयाचे व प्रदर्शनाचे उद्घाटन १७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ०६ वाजता पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हस्ते व उर्जा राज्यमंत्री मदन येरावार, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. अपारंपरिक ऊर्जा व ऊर्जा संवर्धनाच्या क्षेत्रात दररोज नवनवीन तंत्रज्ञान विकसीत होत आहे. या ऊर्जा स्त्रोतांचा व ऊर्जा संवर्धनाचा प्रचार व प्रसार होण्याच्या व विविध योजना सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने महाऊर्जा विभागीय कार्यालय, पहिला मजला, आयडीबीआय बँकेच्या वर, औसा रोड, लातूर येथे करण्यात आले आहे. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान (टाऊन हॉल मैदान), लातूर येथे १७ ते २० नोव्हेंबर दरम्यान अपारंपरिक ऊर्जा व ऊर्जा संवर्धन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात अपारंपरिक ऊर्जा व ऊर्जा बचत क्षेत्राशी निगडीत अनेक उत्पादकांची दालने उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे एकाच छताखाली अपारंपरिक उर्जेविषयीची माहिती आत्मसात करण्याची संधी जनसामान्यांना तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. जिल्हयातील जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनात उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण विभागीय कार्यालयाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक उमाकांत पांडे यांनी केले आहे.
Comments