HOME   लातूर न्यूज

पत्रकारितेची मुल्ये व गुणवत्ता टिकविणे हे मुख्य आव्हान

राष्ट्रीय पत्रकारदिनी प्रा. शिवशंकर पटवारी यांचे प्रतिपादन


पत्रकारितेची मुल्ये व गुणवत्ता टिकविणे हे मुख्य आव्हान

लातूर: पत्रकारितेतील आवाहनांचे स्वरुप परिस्थितीनुसार बदलत असून त्यामध्ये मुल्य व गुणवत्ता टिकविणे हे मुख्य आव्हान असल्याचे प्रतिपादन शाहू महाविद्यालयाचे वृत्तपत्र विद्या विभाग प्रमुख प्रा. शिवशंकर पटवारी यांनी राष्ट्रीय पत्रकारिता दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी केले. विभागीय माहिती कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी ‘माध्यमांसमोरील आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के, सहाय्यक संचालक श्रीमती मीरा ढास, महानगरपालीकेचे जनसंपर्क अधिकारी समीर मुलानी, ज्येष्ठ पत्रकार सर्वश्री जयप्रकाश दगडे, अशोक चिंचोले, प्रवीण नणंदकर, चंद्रकांत झेरीकुंठे, अरुण समुद्रे, रवींद्र जगताप, माहिती सहाय्यक मखदुम काझी यांची उपस्थिती होती. प्रा. पटवारी पुढे म्हणाले की, माध्यमांसमोरील आव्हानाचे वेगवेगळे स्तर असून यामध्ये माध्यम समूह, मालक व पत्रकार यांच्यासमोर येणारी आव्हाने ही वेगवेगळी आहेत. एकंदरीतच माध्यम क्षेत्रात बदल होऊन नवनवीन तंत्रज्ञान दररोज येत असल्याने पत्रकासमोर ते तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे मोठे आव्हान आहे. हे आव्हान आत्मसात करुन सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम पत्रकारांना करावे लागणार असल्याने त्यांच्यात पत्रकारितेची मूलतत्वे व गुणवत्ता असणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पत्रकारांची वैचारिक, सामुहिक, सामाजिक पातळी चांगली असणे अत्यंत महत्वाचे असून समाजातील प्रमुख समस्यांना वाचा फोडून सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला पाहीजे. पत्रकारिता विषयाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगतांना, विकसीत, विकसनशील व अविकसीत राष्ट्रातील ततकालील आव्हानांची सविस्तर माहिती दिली.
१९९५ नंतर पुन्हा पत्रकारितेमध्ये बदल होवून यावेळी सोशल मिडीयाचा उदय झाल्याचे सांगतांना नूतन पत्रकारांना नवनवीन आव्हानांना समोर जावे लागत आहे. सध्याच्या समाज माध्यमांवर भाष्य करतांना प्रा. पटवारी म्हणाले की, यामध्ये प्रत्येकाला वैयक्तीकरित्या एखाच्या घटना व विषयावर लिहिता येत असले तरी त्यात स्वार्थच अधिक दिसतो. त्यामुळे सामाजिकता हरवत चालल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांना सध्याच्या सोशल मिडीयाच्या काळात प्रशिक्षणाची गरज असून पत्रकारांनी सत्य, असत्य तपासून समाजाची गरज या प्राधान्यक्रमाने बातमी सादर करण्याचे आवाहन त्यांनी केले. ज्येष्ठ पत्रकार अरुण समुद्रे, सुनिल सोनटक्के यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लेखापाल अशोक माळगे तर आभार सहाय्यक संचालक श्रीमती मीरा ढास यांनी मानले. या कार्यक्रमास पत्रकार सर्वश्री विजयकुमार स्वामी, बालाजी वागलगावे, नरसिंह घोणे, वामन पाठक, दत्तात्रय परळकर, श्री. जाधव, रोहीत हंचाटे, शिवाजी पारेकर उपस्थित होते. विभागीय माहिती कार्यालयाचे वरीष्ठ लिपीक चंद्रकांत कारभारी, अहमद बेग, चंद्रकांत गोधने, रामकीसन तोकले, चंद्रकांत आराध्ये व जिल्हा माहिती कार्यालयचे नंदु पवार, कैलास लांडगे, श्रीमती चित्रा घोडके, आश्रुबा सोनवणे, मोहन कोळी, कलीम शेख आदि कर्मचा-यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.
पत्रकार चिंचोले यांचा सत्कार
जलयुक्त शिवार अभियान सन २०१५-१६ अंतर्गत उत्कृष्ट लिखाण करुन अभियानाला गती देण्यासाठी मदत करणा-या पत्रकारांना देण्यात येणारा विभागस्तरावरील राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार (द्वितीय क्रमांक) व जिल्हा स्तरावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार (प्रथम पुरस्कार) मिळाल्याबद्दल तसेच राज्य शासनाच्या कै. शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सांय. दैनिक भूकंपचे संपादक अशोक चिंचोले यांचा सत्कार जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांच्या हस्ते करण्यात आला.


Comments

Top