उदगीर: येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नगरसेवकांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत असून त्यांच्या कारभाराची चौकशी करुन त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी उदगीरचे नगराध्यक्ष बसवराज बागबंदे यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची भेट घेवून केली आहे. उदगीर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नितीन कापडणीस यांनी ०७ नोव्हेंबरच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक निवृती सांगवे याना अवमानास्पद वागणूक देवून एकेरी भाषा वापरली. पीठासिन अधिकारी नगराध्यक्ष बागबन्दे यांची परवानगी घेऊनच सांगवे हे बोलत असताना मुख्याधिकारी कापडणीस यांनी सांगवे यांच्याशी वाद केला. यामुळे नगरसेवकात असंतोष निर्माण झाला आहे.
मुख्याधिकारी हुकुमशहासारखे वागत आहेत. पालिका हद्दितील नागरिकांना दहशतीखाली ठेवण्यासाठी बिनबुडाच्या नोटिसा काढून त्रास देत आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभागृहाला विश्वासात न घेता रोज नवीन आदेश काढून बेकायदेशीर वसुली करण्याचे काम करीत आहेत. विकास कामांच्या निविदा प्रकाशित करण्यासाठी विलंब करतात. निविदा प्रकाशित केल्यानंतर ही संबंधित ठेकेदाराला लवकर कार्यारंभ देत नाहीत. पालिकेच्या निवृत्ती वेतनही बेजबाबदारीने वाटप करतात. नगरसेवक पालिकेच्या कामाबाबत विचारणा केल्यास नगरसेवक पद रद्द करण्याची धमकी देतात. पालिकेने त्यांना दिलेले निवासस्थान व पालिका इमारतीतील त्यांचे कार्यालय सुस्थितीत असताना सभागृहाची परवानगी न घेताच दोन्ही ठिकाणी लाखों रुपये खर्च केले. त्यांच्या मनमानी व हुकुमशाही वृत्तीमुळे नगरसवेक व पालिका कर्मचारी दहशतीखाली आहेत. सामान्य नागरिकांसोबत त्यांची वागणूक उद्दामपणाचीच असुन त्यांच्या कारभाराची चौकशी करुन त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली आहे. जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनावर नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, उपाध्यक्ष सुधीर भोसले, भाजपाचे गटनेते बापूराव यलमटे, काँग्रेसचे गटनेते मंजुरखां पठाण, एमआयएमचे गटनेते ताहेर हुसेन यांच्यासह सभापती व नगरसेवकांच्या स्वाक्षर्या आहेत.
Comments