लातूर: अहमदनगरच्या कोपर्डी बलात्कार आणि हत्येप्रकरणी तीनही आरोपींना दोषी सिद्ध झाले. न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करतो. या तिन्ही दोषींना फाशीचीच शिक्षा होईल तसेच पिडीत भगिनीला आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळेल असे मत लातूर जिल्हा परिषदचे सदस्य आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष धीरज देशमुख यांनी व्यक्त केले. संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी खून आणि बलात्कार प्रकरणात तिन्ही आरोपींना कोर्टानं दोषी ठरवलंय. २१ आणि २२ नोव्हेंबर त्यांना त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ या तिन्ही आरोपींना कोर्टानं दोषी सिद्ध केलंय. १३ जुलै २०१६ रोजी नगरच्या कोपर्डी गावात नववीत शिकणाऱ्या मुलीवर तिन्ही दोषींनी बलात्कार केला, त्यानंतर अतिशय निर्घृण पद्धतीनं तिच्यावर शारीरिक अत्याचार झाले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. २१ नोव्हेंबर रोजी कोर्ट शिक्षा सुनावणार आहे. कोपर्डी येथे घडलेली घटना दुर्दैवी व महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी होती. आज आरोपींचा गुन्हा सिद्ध झाला आहे, मात्र अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा होऊ नये व कायद्याचा वचक निर्माण होण्यासाठी तिन्ही दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी धीरज देशमुख यांनी केली आहे.
Comments