लातूर: महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जाचे) लातूर, उस्मानाबाद, हिंगोली व नांदेड या चार जिल्ह्यासाठीचे विभागीय कार्यालय लातूर येथे स्थापन करण्यात आलेले असून त्या कार्यालयाचे उद्घाटन कामगार कल्याण व कौशल्य विकास मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. अपारंपारीक ऊर्जास्त्रोतांचा व ऊर्जा संवर्धनाचा प्रचार व प्रसार होण्याच्या दृष्टीने महाऊर्जा मार्फत राज्यातील प्रमुख शहरात प्रदर्शनाच्या माध्यमातून अपारंपारीक ऊर्जा व ऊर्जा संवर्धनाबद्दल माहिती देण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून लातूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क मैदानावर अपारंपारीक ऊर्जा व ऊर्जा संवर्धन प्रदर्शन २०१७ चे उद्घाटनही पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री निलंगेकर म्हणाले की, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या सिमेवर सातशे एकर जागा शासनाने घेवून ठेवलेली असून त्या जागेवर राज्यातील पहिले सोलार पार्क उभारण्याचे नियोजन आहे. तसेच लातूर जिल्ह्यात सौरऊर्जेसाठी पोषक वातावरण आहे. कोणत्याही शेतक-यांचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही आणि शेतक-यांना महावितरण कडून योग्य बिले दिले जातील असे निलंगेकर यांनी सांगितले. जर या कामात हलगर्जीपणा झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
Comments