लातूर: अनेकदा आम्हा राजकारण्यांना गोड बोलणारे आवडतात, पण माझं काही चुकलं तर स्पष्टपणे सांगणारे मित्र या लातूर शहराने दिले आहेत. यात डॉक्टर पेशापासून अभियंते, उद्योगपती सगळ्यांचा समावेश आहे, आणि प्रत्येकाला प्रसिद्धीच्या झोतात न येता आपले कार्य करीत राहायचे आहे, त्यामुळे मीही मित्रांच्या सूचना शांतपणे ऐकून त्याप्रमाणे बदलाचा प्रयत्न करतो, असे प्रतिपादन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
राजीव गांधी चौकातील विश्रामगृहा शेजारी उभारण्यात आलेल्या डॉ. इंद्रजित लकडे यांच्या रक्षा चाईल्ड केअर बालरुग्णालयाच्या लोकार्पण सोहळा रविवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील, महापौर सुरेश पवार, अॅड. व्यंकट बेद्रे, जिल्हापरिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, आयएमएचे जिल्हाध्यक्ष डॉ. अशोक आरदवाड, नगरसेवक रविशंकर जाधव, चंद्रकांत पाटील, शोभा पाटील, डॉ. निता मस्के पाटील, प्रा. सुप्रिया लकडे, डॉ. दिपक लांडे, पंचायत सभापती संजय दोरवे, अरविंद पाटील, मनोहर लकडे आदी उपस्थित होते.
या वेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, `'इमारतींच्या उंचीवरून शहराच्या विकासाचे मोजमाप करणे योग्य नाही, तर त्यासाठी तरुणांमध्ये वर्तुणात्मक बदल होणे आवश्यक आहे. तरच त्या शहराचा विकास झाला असे म्हणता येईल. डॉ. लकडे यांच्या या अत्याधुनिक सुविधांनी युक्त हॉस्पिटल प्रसंगी त्यांनी त्यांच्या जिल्हापरिषद शाळेतील शिक्षकांपासून वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षकांनाही या सोहळ्याला बोलावले आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. पद असो अथवा नसो आपली वागणूक हीच आपली ओळख झाली पाहिजे, यासाठी आपले मित्र मोलाचे मार्गदर्शक ठरतात. राजकीय पक्षांचे महत्व हे केवळ निवडणुकीपुरते परिणामकारक असते. मात्र इतर वेळी आमदार हा सर्व जनतेचा असतो.
रुग्णालय खूप सुंदर असेल तर रुग्णाचा अर्धा आजार तेथेच बरा होतो, असा समज या रक्षा बालरुग्णालयाची इमारत पाहिल्यानंतर खरा वाटतो असे याप्रसंगी महापौर सुरेश पवार म्हणाले. प्रास्ताविक डॉ. इंद्रजित लकडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. दिलपी लांडे यांनी केले. या रक्षा चाईल्ड केअर बालरुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्याला डॉ. सचिन चव्हाण, वैद्यकीय अधिक्षक डॉ. शैलैंद्र चव्हाण, विजय जाधव, अनंत गायकवाड यांच्यासह खरोळा, निलंगा आणि शहरातील डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments