लातूर: वृक्ष असतील तर आपण राहू हा संदेश डॉ.एस.एन.सुब्बाराव यांनी दिला आहे. सुब्बाराव म्हणजे प्रेरणादायी समाजकर्मी, ९० वर्षीय चिरतरुण डॉ. एसएन सुब्बाराव ‘लातूर वृक्ष’च्या कार्यक्रमात बोलत होते. डॉ. सुब्बाराव यांनी ‘लातूर वृक्ष’ च्या कार्याचे कौतुक करीत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. मूळ कर्नाटक राज्यातील डॉ. सुब्बाराव यांनी शाळेत असताना महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. चंबल घाटीतील जवळपास ३०० खतरनाक डाकुंचे जननायक जयप्रकाश नारायण यांच्या समोर प्रत्यार्पण डॉ. सुब्बाराव यांनी करून घेतले व त्या सर्व डाकुंना मुख्य प्रवाहात आणत त्यांचे पुनर्वसन केले. समाजसेवक बाबा आमटे यांच्या सोबतही त्यांनी कार्य केले आहे. डॉ. सुब्बाराव हे अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित आहेत. मागील अनेक वर्षांपासून ते युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी अमेरिका, इंग्लंडसह संपूर्ण भारतात युवकांची शिबिरे घेत आहेत. लातूर वृक्ष सारखे कार्य चिरंतन चालू राहीले पाहीजे, प्रत्येकाने वाढदिवस, लग्न समारंभ, सण, यादिवशी सर्वांनी वृक्ष लागवड करुन दत्तक घेतले पाहीजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जिवलग फौंडेशन, निलंगा येथे आयोजित कार्यक्रमत सहभागी होण्यासाठी आज डॉ. सुब्बाराव यांचे लातुरात सकाळी आगमन झाले. याप्रसंगी लातूर वृक्ष चे मुख्य समन्वयक सुपर्ण जगताप यांनी लातूर वृक्ष या लोकचळवळीची माहिती त्यांना दिली. लातूर वृक्षच्या उपस्थित सर्व सदस्यांनी एक वृक्ष भेट म्हणून दिले. याप्रसंगी लातूर वृक्षचे डॉ. बोरगावकर, इम्रान सय्यद, सोनू डगवाले, डॉ.पवन लड्डा, सचिन दाताळ, प्रा. ओमप्रकाश झुरुळे, प्रा मिनाक्षी बोंडगे, माधव बावगे, राजमाने सर व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments