HOME   लातूर न्यूज

धीरज देशमुखांचा जि.प. सभेवर बहिष्कार

स्वच्छतेवरील सर्वसाधारण सभेत आधी शेतकर्‍यांचा विषय घेण्याची मागणी, उपाध्यक्षांचा विरोध


धीरज देशमुखांचा जि.प. सभेवर बहिष्कार

लातूर: शेतकर्‍यांचे प्रश्न अतिशय गंभीर बनत चालले आहेत. आपण सर्वजण ग्रामीण भागातून निवडून आलो आहोत. त्यामुळे आधी शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर चर्चा व्हायला हवी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत धीरज देशमुख यांनी केली. अनेकदा विनंत्या करुनही त्याला प्रतिसाद न मिळाल्याने आणि उपाध्यक्षांनी विरोध केल्याने देशमुख यांनी सभात्याग केला. त्यांचे अनुकरण कॉंग्रेसच्या अन्य सदस्यांनीही केले.
स्वच्छतेच्या विषयावर आज लातूर जिल्हा परिषदेने विशेष सभा बोलावली होती. अशा प्रकारची सभा घेणारी लातुरची जिल्हा परिषद राज्यात पहिली परिषद आहे. ही सभा सुरु होण्यापूर्वी जिल्हा परिषदेचे सदस्य आणि युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज देशमुख यांनी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याजवळ कार्यकर्त्यांसह धरणे आंदोलन केले, घोषणा दिल्या.
सरसकट कर्जमाफी करावी, शेतीमालाला हमीभाव द्यावा, शेतकर्‍यांची थकित वीज बिले माफ करावीत, विमा नुकसान भरपाईतून वगळलेल्या गावांना तातडीने मदत द्यावी, शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर जिल्हा परिषदेची विशेष सभा आयोजित करावी, ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. स्वच्छतेच्या मुद्द्यावर सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली ही बाब ऐतिहासिक आहे. पण या सभेत शेतकर्‍यांचे प्रश्न ज्वलंत असल्याने ते आधी घेऊन स्वच्छतेचा विषय नंतर घेतला असता तरी चालले असते पण तसे झाले नाही, शेतकर्‍यांसाठी दुसरी सभा बोलाऊ किंवा दुसर्‍या सभेत या विषयावर बोलू असं सांगण्यात आलं. याचा निषेध करीत आम्ही सभात्याग केला, जोपर्यंत शेतकर्‍यांचे प्रश्न सभागृहात मांडले जात नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असेच चालू राहील असं धीरज देशमुख यांनी सांगितलं. यावेळी धनंजय देशमुख, नारायाण लोखंडे, दगडू पडीले, विजय देशमुख, संभाजी रेड्डी, सुपर्ण जगताप यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


Comments

Top