लातूर: दोन दिवसांपूर्वी घडलेल्या अविनाश चव्हाण हत्याकांडाने सबंध जिल्हा हादरला होता. पोलिसांनी तातडीने कारवाई करीत या प्रकरणात पाच आरोपींना शिताफीने पकडून लातुरकर आणि चव्हाण कुटुंबियांना दिलासा दिला आहे. शिकवणी वर्गाच्या व्यवसायातील स्पर्धेतून हे कांड घडल्याचे समोर आले आहे. स्टेप बाय स्टेपमध्ये चालू असलेली फीमधील कट प्रॅक्टीस सर्वांची डोकेदुखी बनली होती. त्या रागातून-इर्षेतून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येते.
या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार चंदनकुमार शर्मा असल्याचे पोलिस अधीक्षक शिवाजी राठोड यांनी सांगितले. या खुनासाठी करण चंद्रपालसिंग याला २० लाखांची सुपारी देण्यात आली होती. त्यापैकी ८.५० लाख रुपये शरद घुमे याने दिले होते. या सबंध प्रकरणात महेशचंद्र घोगडे याने समन्वयाची भूमिका निभावली. खुनाआधी चार जूनपासून रेकी केली जात होती. खुनासाठी वापरण्यात आलेले पिस्टल बिहारहून आणण्यात आले होते. प्रत्यक्ष खुनावेळी अक्षय शेंडगे मोटारसायकल चालवत होता. पाठलाग करुन त्यांनी हा प्रकार केला. अविनाश चव्हाण फोन आला म्हणून गाडी थांबवून बोलत होते. त्याचाच गैरफायदा या आरोपींनी घेतला. गुन्ह्यात वापरलेलं शस्त्र आणि दोन लाख ३३ हजार पोलिसांनी जप्त केले आहेत. या आधी अशोक पवार यांनी अभय साळुंके, मोटेगावकर, चौगुले आणि पप्पू धोत्रे याची नावे घेतली होती. आज अटक केल्यात यांच्यापैकी कुणाचाही समावेश नाही.
Comments