लातूर: मराठवाड्यात गाजत असलेल्या स्टेप बाय स्टेप शिकवणीचे संचालक अविनाश चव्हाण खून प्रकरणातील पाच आरोपींना पुन्हा पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे. आज त्यांची कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात सादर करण्यात आलं. एका गाडीतून तिघांना आणि दुसर्या गाडीतून दोघांना आणण्यात आलं. सगळ्या आरोपींना काळे बुरखे घालण्यात आले होते. मुख्य न्याय दंडाधिकारी लोखंडे यांच्या कोर्टात ही सुनावणे झाली. सरकारी विधिज्ञ तिडके यांच्या युक्तीवादानुसार या सर्वांना आणखी पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. आरोपीत प्रा. चंदनकुमार छोटेलाल शर्मा, किरण गहेरवार, अक्षय शेंडगे, मध्यस्थ महेशचंद्र गोगडे (रेड्डी), शरद घुमे यांचा समावेश आहे.
२४ जूनच्या मध्यरात्री झालेल्या या खुनात वापरण्यात आलेले पिस्टल हस्तगत झाले आहे. केजच्या रमेश मुंडेकडून हे पिस्टल विकत घेण्यात आले होते. त्यालाही अटक करुन काल सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान तीस जूनपर्यंत शिकवणी गल्लीकडे कुणी फिरकले नाही. रविवारी एक जुलैपासून हळूहळू शिकवण्या सुरु झाल्या. चव्हाण यांच्या स्टेप बाय स्टेप आणि चंदनकुमार यांच्याही शिकवण्या सुरु झाल्या आहेत. काही वर्गातील संख्या मात्र रोडावली आहे. बहुतांश अकरावी बारावीचे विद्यार्थी कॉलेजात फक्त प्रात्यक्षिकांना हजर असतात. बाकी त्यांचं शिक्षण खाजगी शिकवण्यातूनच होत असतं.
अविनाश चव्हाण खून प्रकरणातील काही बाबी आणखी उघड व्हायच्या आहेत, काही लागेबांधेही उघड व्हायचे आहेत अशी चर्चा न्यायालय परिसरात ऐकायला मिळाली. आज नेमकं काय होतं याची मोठी उत्कंठा असल्याने न्यायालयाच्या आवारात मोठी गर्दी होती. या खून प्रकरणामुळे लातूर पॅटर्नची प्रतिमा डागाळल्याची भावना व्यक्त होत आहे.
Comments