लातूर: जलयुक्त शिवार योजनेने मोठी कामगिरी बजावली. त्यानंतर लातुरच्या पालकमंत्र्यांनी ज्लयुक्त आवार योजना शोधली. शहरात पडणारं पाणी शहरातच मुरवायचं असा उदात्त हेतू या योजनेमागे होता. घराच्या छतावर पडणारं पाणी शोषखड्डा किंवा बोअर पुनर्भरणाच्या माध्यमातून जमीनीत जिरवायचं असा सदहेतू या मागे होता. यासाठी त्यांनी मेळावे घेतले, प्रचार फेर्या काढल्या. किती लोकांनी या मोहिमेत सहभाग घेतला हे अजून तरी कळाले नाही. पण शहरातील अनेक मोकळ्या मैदानावर पडलेल्या खड्ड्यातून प्रचंड पाणी साठलेले असते. हे पाणी बाष्पीभवन होऊन निघून जाते. त्याचा लातुरकरांना उपयोग होत नाही. उदाहरणच सांगायचे झाल्यास टाऊन हॉलच्या मैदानाचा विचार करता येईल. या मैदानावर तुडुंब पाणी साचलेले असते. तेही असेच वाया जाते. या मैदानाचा उतार काढून एखाद्या शोषखड्ड्यात ते जिरवले गेल्यास बाजुची डीसीसी बॅंक, महापालिका, गुगळे हॉस्पिटल, आंबेडकर पार्क यांना नक्कीच फायदा झाला असता. योजना केवळ आदर्श असून चालत नाही तर त्यातल्या प्रत्यक्ष अडचणी आणि उणिवांचाही विचार केला गेला पाहिजे. नुसते मंत्री असून चालत नाही!
Comments