लातूर: दोन वर्षापूर्वी गाजावाजा करीत सुरु झालेल्या लातूर मनपाच्या मालकीच्या तीनही सिटी बसेस लातूरच्या रेल्वे स्टेशन मार्गावर पडून आहेत. त्या चालू झाल्या असत्या तर मनपाला रोजच उत्पन्न मिळाले असते. या सेवेचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने आणखी २७ बसेस आणायच्या होत्या पण त्याने त्या आणल्याच नाहीत. फक्त स्वत:च्या मालकीची एक बस तो दिवसभर चालवत असतो. मनपा त्याकडे लक्ष देत नाही उलट खेदाची बाब अशी की मनपाची परिवहन समिती सुद्धा अद्याप गठीत झाली नाही. गुत्तेदाराचा परिवहनाचा ठेका केवळ नावाला चालू आहे. त्यातून मनपाला काहीच मिळत नाही. मनपाच्या गाड्यांसाठी त्याने प्रति किलोमीटर तीन रुपये पंधरा पैसे द्यायचे आणि ठेकेदाराने आणायच्या प्रस्तावित गाड्यांसाठी प्रति किलोमीटर एक रुपया पासष्ट पैसे मनपाला द्यायचे असे साधारणत: या ठेक्याचे स्वरुप होते. पण यातून काहीच निषन्न व्हायला तयार नाही. जोपर्यंत परिवहन समिती स्थापन होत नाही तोपर्यंत यातला कुठलाच प्रश्न मार्गी लागू शकत नाही. या समितीचा दर्जा वैधानिक असल्याने समितीला स्वायत्तता आहे. स्थायी समितीकडेसुद्धा या समितीला जाण्याची गरज नाही. एवढे ‘रान मोकळे’ असताना लातूर मनपाच्या विद्यमान कार्यकारी मंडळाला मनपाचा फायदा कसा दिसत नाही असा प्रश्न विचारला जात आहे.
(शहर परिवहन विभागातला महाघोटाळा उद्या पाहुया)
Comments