लातूर: राज्यमंत्री कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी त्यांच्या २०५ एकर माळरान जमीनित बांबूची लागवड केली. कमी पाण्यात बांबुची लागवड ऊसापेक्षाही परवड्ते असं पाशा पटेल म्हणतात.बांबूच्या लागवडीमुळे वनक्षेत्र वाढते तसेच या माध्यमातून शेतकर्यांना शाश्वत उत्पन्न मिळू शकते. बांबूपासून अनेक वस्तू तयार करता येत असल्याने रोजगारही मिळतो. मराठवाड्यात आता बांबूची लागवड सुरू झाली असून या माध्यमातून आगामी कांही वर्षात मराठवाड्याचे चित्र पालटणार असल्याचे मत महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे कार्यकारी संचालक थंगम साईकुमार रेड्डी यांनी व्यक्त केले.
फिनिक्स फाऊंडेशन संस्था लातूर व महाराष्ट्र वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने लोदगा येथे ङ्गिनिक्स फाऊंडेशनच्या जागेत ५१ हजार बांबूच्या झाडांचे रोपण मंगळवारी (दि. ३१) करण्यात आले. वृक्षारोपणानंतर आयोजित कार्यक्रमात रेड्डी बोलत होते. महाराष्ट्र राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास विभागीय वन अधिकारी आर. के. सातेलीकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे, उस्मानाबादचे सहाय्यक वन संरक्षक आर. जी. मुद्दमवार, गटशेतीचे प्रणेते डॉ. भगवान कापसे, अमृत पॅर्टनचे जनक अमृतराव देशमुख, प्रयोगशील शेतकरी राजशेखर पाटील, कृषीमुल्य आयोगाचे सदस्य अचुत गंगणे, उपविभागीय अधिकारी चाऊस यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना रेड्डी म्हणाले की, पुर्वी बांबु वृक्ष या संवर्गात होता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आता बांबू हा वृक्ष नव्हे तर गवत वर्गात त्याचा समावेश झाला आहे. यामुळे बांबूची लागवड सोपी झाली आहे. बांबुमुळे कायमस्वरुपी वन क्षेत्रात वाढ होते. एक एकरात ४० टन बांबुचे उत्पादन घेता येवू शकते. एक टन बांबूला ३ हजार ५०० रुपये दर मिळतो. यामुळे शेतकर्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होऊ शकते. बांबूचे अनेक उपयोग आहेत. पेपर इंडस्ट्रीज, बांधकाम साहित्य, फर्निचरसह कपडा निर्मितीही बांबू पासून करता येते. बांबूच्या माध्यमातून इथेनॉल निर्मिती शक्य आहे. जगात बांबूच्या दिड हजार जाती असून देशात १२६ तर राज्यात ३ प्रकारचे बांबू आढळतात. बांबू ही उपयोगी वस्तू असून त्यापासून १ हजार ५०० वस्तू तयार करण्यात येवू शकतात. बांबूची उपयोगीता लक्षात घेवून अंतराळ याने प्रक्षेपित करणार्या इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी त्यावर संशोधन सुरू केले आहे. अंतराळ यान पृथ्वीच्या कक्षेत परत येताना होणारे घर्षण आणि त्यातून निर्माण होणारी उष्णता कमी करण्यासाठी बांबू उपयुक्त असल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे, असेही रेड्डी म्हणाले.
यावेळी बोलताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी बांबू हे चांगली पर्यायी पीक असल्याचे सांगितले. राजशेखर पाटील यांनी बांबू लागवडीचा आपला अनुभव कथन केला. निवृत्त वन अधिकारी भोसले यांनी मराठवाड्यात २ कोटी २० लाख बांबू रोपांची लागवड शक्य असल्याचे सांगितले. विभागीय वन अधिकारी सातेलीकर यांनी बांबूच्या माध्यमातून वनक्षेत्राच्या वाढीसह पर्यजन्यमान वाढण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले.
आपल्या प्रास्ताविकपर भाषणात राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी आजही आपल्या देशात बांबूची आयात करावी लागत असल्याचे स्पष्ट केले. देशात केवळ ११ टक्के तर लातूर जिल्ह्यात १ टक्का वन क्षेत्र शिल्लक आहे. मानव जातीच्या संरक्षणासाठी तसेच वाढते तापमान कमी करण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक आहे. मराठवाड्यात बांबू लागवडीच्या माध्यमातून आगामी पाच वर्षात वनक्षेत्राचे प्रमाण ११ टक्क्यापर्यंत पोहोचविण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशन कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. बांबू पासून विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण लोदगा येथेच दिले जाणार असल्याचेही पाशा पटेल म्हणाले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ङ्गिनिक्स फाऊंडेशनच्या परिसरात बांबूची रोपे लावण्यात आली. संयोजकांच्यावतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात मंगळवेढा येथे बांबूची लागवड करणारे दत्तात्रय नेने, औरंगाबाद जिल्ह्यात इसारवाडी येथे १५० एकरावर अंबा लागवड करणारे रसुल शेख तसेच प्रा. नागनाथ कनामे यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. मंजूर शेख यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास लोदगासह परिसरातील ५० गावातील विविध संस्थांचे प्रतिनिधी, नागरीक व शेतकर्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Comments