नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षातील संयमी, सर्वांना एकत्र घेऊन जाणारं, विरोधी पक्षांशी मैत्रीचं नेतृत्व आज अनंतात विलीन झालं. स्मृती स्थळावर तिन्ही दलांनी त्यांना सलामी दिली. त्यांच्या मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी मुखाग्नी दिला. राष्ठ्रपती, पंतप्रधान आणि अनेक मान्यवरांनी या ठिकाणी त्यांना पुष्पचक्र अर्पण केलं. आज दुपारी दोनच्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा निघली, सर्व पक्षांचे बडे नेते यात सहभागी झाले होते. भाजपाच्या मुख्यालयात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. या ठिकाणीही मोठी गर्दी झाली होती. मागच्या ३६ तासात त्यांची प्रकृती प्रचंड खालावली होती. त्यांना मधुमेह होता, एकच मूत्रपिंड काम करीत होते. दोन दिवसांपासून त्यांचे शरीर औषधोपचाराला प्रतिसाद देत नव्हते. आज साडेपाच वाजता प्रसिद्ध करण्यात आलेल्या मेडीकल बुलेटीनमध्ये अटलजी आता आपल्यात नाहीत हे जाहीर करण्यात आले.
राजकारणात येण्याची आपली मुळीच इच्छा नव्हती. यात फसलो. पण ठरवलं की असं काम करायचं की हा चांगला माणऊस होता असं आपल्या पश्चात लोकांनी म्हणावं असं अटलजी अनेकदा म्हणायचे. अटलजींच्या अंत्यसंस्काराला इतर देशातीलही नेते हजर होते. प्रसिद्ध कवी, प्रखर वक्ता, सशक्त पत्रकार आणि जनतेचा नेता अशी त्यांची ख्याती होती. तीनदा पंतप्रधानपद भूषवणारे अटलजी लातुरातही अनेकदा येऊन गेले होते. त्यांच्या अस्थी हरिद्वार येथे विसर्जित केली जाण्याची शक्यता आहे. आजचे भाजपाचे बडे नेते आणि अटलजी यांची तुलना केल्यास नेता कसा असावा याची प्रचिती येते. आज भाजपाला मिळालेली सत्ता याचा पाया अटलजींनीच घातला होता असे जाणकार सांगतात.
Comments