लातूर: साधारणत: तंटामुक्तीच्या अध्यक्षांची निवड आवाजी पद्धतीने किंवा हात वर करुन होते पण शिऊर गावात अवैध व्यवसाय करणार्या मंडळींनी सभा बिघडवण्याचा प्रयत्न केला. परिणामी पोलिसांना पाचारण करुन मतदान करावे लागले आणि गावातील धडपड्या तरुण ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांची निवड विक्रमी मतांनी झाली. त्याचा हा किस्सा......
शिऊर ग्रामपंचायतीचे मतदानसुध्दा एवढे जोमात झाले नसेल तेवढ्या जोमात तंटामुक्तीच्या अध्यक्षपदासाठी भर पावसात उभा राहून गावकर्यांनी तंटामुक्ती अधक्ष निवडला आहे. शिऊर गावचे विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर सुर्यवंशी यांना गावाने पुन्हा काम करण्याची संधी दिल्याने त्यांचा १५० मतांनी विजय झाला आहे. लातूर तालुक्यातील शिऊर गावचे तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर सुर्यवंशी यांनी गावातील अवैध धंदे व वाळू तस्करी थांबवल्याचा राग अनेकांच्या मनात खदखदत होता. तंटामुक्ती अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्याने नवीन तंटामुक्ती अध्यक्षाची निवड करण्यासाठी गुरुवारी सकाळी ९.३० वाजता ग्रामसभा भरली. १२.३० वाजेपर्यंत ती रेंगाळत चालली. याप्रसंगी गावातील अवैध व्यवसाय करणार्या लोकांनी ज्ञानेश्वर सुर्यवंशीसह ग्रामस्थांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली असून त्यावेळी पोलिसांनी बघ्याची भुमिका घेतली होती. अध्यक्षपदासाठी गावात मतदान घेण्याचे ठरले. त्यानुसार विद्यमान अध्यक्षासह ६ जणांनी उमेदवारी भरली. काही वेळात ४ जणांनी उमेदवारी माघारी घेतली. दोन उमेदवार फक्त रिंगणात राहिले. एकूण २७५ मतदान होते. ग्रामस्थांनी पावसात उभा राहून मतदान केले. ग्रामसेवक, पोलीस व उमेदवारांच्या उपस्थितीत मतमोजणी होऊन ज्ञानेश्वर सुर्यवंशी १५० मतांनी निवड झाली. त्यावेळी त्यांनी गावाच्या शांततेसाठी व सुव्यवस्थेसाठी काम करणार असल्याचे सांगितले.
Comments