लातूर: पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसने पुकारलेल्या आजच्या भारत बंदला देशभरातील २२ पक्षांनी पाठिंबा दिला आहे. बंद यशस्वी करण्यासाठी या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर उतरून केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. तसेच पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याची जोरदार मागणी केली आहे. याच पार्श्वभुमीवर लातूर जिल्हा बंद करण्यासाठी जिल्हाभरातील कॉंग्रेस नेते, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. लातूर शहरात सकाळपासूनच सर्व पेट्रोलपंप बंद ठेवण्यात आले आहेत तर या सरकारने जनतेची दिशाभुल करून सत्ता मिळवली आहे असा आरोप आ. अमित देशमुखांनी केला असून एक देश एक कर प्रणाली जर या सरकारने अवलंबली असती तर पेट्रोल डिझेलचे भाव कमी झाले असते. पेट्रोल डिझेलचे भाव गगनभेदी चुंबन घेत आहेत. कॉंग्रेसच्या काळात पेट्रोलचा दर ६० रुपये प्रती लिटर होता आज तोच भाव ८८ रुपये आहे. या सरकारने १२ लाख कोटी इतका कर गोळा केला खरा पण सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडेल असे भाव आज पेट्रोलचे झाले आहेत असे अमित देशमुख म्हणाले. लातूर शहरातच नव्हेतर सबंध लातूर जिल्हात आज बंद पाळण्यात आला आहे. या बंदमध्ये शेकडो कार्यकर्ते आणि सामान्य जनतेचा समावेश पहावयास मिळाला आहे.
Comments