लातूर: विशालनगर भागात अपूर्वा यादव या तरुणी-विद्यार्थीनीच्या निर्घृण हत्येने सगळा जिल्हा अस्वस्थ झाला होता. काल घडलेल्या या प्रकरणाचा तपास पोलिसांनी २४ तासांच्या आत लावला. मुख्य आरोपी अमर शिंदेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, अपर पोलिस अधीक्षक काकासाहेब डोळे, डीवायएसपी हिम्मत जाधव, पोलिस निरीक्षक सुनील नागरगोजे, सपोनि अशोक माळी यांनी पाहणी केली होती. अमर शिंदेला ठाण्यात हजर करण्यात आल्यानंतर सार्थक जाधव याच्या आत्महत्येचा बदला घेण्यासाठी अपूर्वाचा खून केल्याचे अमर शिंदे याने सांगितले. या प्रकरणातील पुरावे जमविण्याचे काम सुरु आहे.
काल विशालनगर येथील अपूर्वा अनंत यादव या एकोणीस वर्षीय मुलीचा मृतदेह तिच्या राहता घरात आढळून आला होता. पोटात आणि गळ्यात चाकूने भोसकून तिचा खून करण्यात आला होता. ही घटना घडली त्यावेळी घरात तिची आई नव्हती. तिचे वडील कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. काहीच दिवसापूर्वी अपूर्वा लातुरात आली होती. ती कर्नाटकात वैद्यकीय शिक्षण घेत होती. अपूर्वाची आई घरी आल्यावर तिला झालेली घटना कळाली. तात्काळ तिला लातूरच्या शासकीय दवाखान्यात आणले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते.
Comments